

मेलबर्न, वृत्तसंस्था : विश्वचषकातील (T-20 World Cup) भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे संकट असल्याचे वृत्त ऐकून चाहत्यांचा हिरमोड झाला आहे, परंतु त्यापेक्षा जास्त काळजी थेट प्रसारण करणार्या टेलिव्हीजन कंपन्यांना बसणार आहे. त्यांचे कित्येक कोटींनी नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.
टी-20 वर्ल्डकप (T-20 World Cup) स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे होणार्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधील बाबर आझमच्या संघाने बाजी मारून इतिहास घडविला होता. पाकिस्तानने प्रथमच टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर विजय मिळवला. त्यानंतर आशिया चषक 2022 मध्ये भारत – पाक यांच्यात दोन सामने झाले आणि हिशेब 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे मागच्या वर्ल्डकपच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आजही भारतीय संघ आतूर आहे. पण, हा सामना होण्याची शक्यता 20 टक्केच आहे.
रविवारी चाहत्यांना किमान 5-5 षटकांचा तरी सामना होईल अशी अपेक्षा आहे, परंतु तसे न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. कारण साखळी गटातील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. 10 पेक्षा कमी षटके झाल्यास आयोजकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
आयोजकांना प्रेक्षकांना 37 कोटी 25 लाख 23,950 रुपयांचे रिफंड करावे लागणार आहे, पण सर्वात मोठे नुकसान हे थेट प्रक्षेपण करणार्या चॅनेलवाल्यांचे होणार आहे. या वर्ल्डकपसाठी कंपन्यांनी कित्येक कोटी रुपये देऊन प्रसारण हक्क विकत घेतले आहेत, पण जर भारत-पाकिस्तान सामना झाला नाही तर त्यांना जाहिरातीतून महसूल मिळणार नाही. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होईल.
ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी मेलबर्न येथे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पावसाची शक्यता 80 टक्के आहे. सायंकाळी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असल्याने भारत-पाकिस्तान सामना होणार नसल्याचाच अंदाज व्यक्त केला गेला आहे. रविवारीच नव्हे तर शनिवारीही पाऊस 95 टक्के पडेल असे सांगण्यात येत आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान यांचे अनुक्रमे न्यूझीलंड व अफगाणिस्तानविरुद्धचा सराव सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.
हे ही वाचा