Latest
Supriya Sule : पवार कुटुंबियांची यंदाची दिवाळी एकत्रच; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी दिवाळी पाडव्याला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पवार कुटुंबिय बारामतीत गोविंदबागेत एकत्र भेटतात. यंदा बदललेल्या राजकीय समिकरणानंतरही पवार कुटुंबियांची दिवाळी एकत्रच साजरी होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. राजकीय मतभेद वेगळे असतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, असेही त्या म्हणाल्या. बारामती येथील माळावरच्या देवीच्या दर्शनासाठी त्या आल्याअसताना पत्रकारांशी बोलत होत्या.
राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा पुनरुच्चार सुळे यांनी केला. शिवाय रविवारी (दि. २२) भिगवणजवळ होणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण एकाच व्यासपीठावर असाल का या प्रश्नालाही उत्तर दिले. त्या म्हणाल्या, एक तर राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहेत.
आमच्यातील काही सहकारी वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत गेले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यासंबंधीची कायदेशीर लढाई न्यायालयात व निवडणूक आयोगात सुरु आहे. परंतु विद्या प्रतिष्ठान व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या दोन संस्था सामाजिक काम करतात. विद्या प्रतिष्ठानची स्थापना ५० वर्षांपूर्वी शरद पवार यांनी केली. या दोन्ही संस्थांच्या कार्य़क्रमाला पवार कुटुंबिय कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आले आहे. त्याला राजकीय स्वरुप देणे चुकीचे ठरेल.
पवार कुटुंबिय एकत्र दिवाळी साजरी करणार का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, गोविंदबाग हे महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेचे अधिकाराचे घर आहे. त्यामुळे ३६५ दिवस ते उघडेच आहे. तुम्ही तेथे कधीही येवू शकता. तेथे माझ्यापेक्षा तुमचा गुंजभर अधिकार जास्त आहे. नेते म्हणून नाही तर कौटुंबिक नाते म्हणून आम्ही एकत्र येवू. पवार कुटुंबियांची दिवाळी कालही एकत्र साजरी होत होती. आजही आहे. उद्याही ती होईल. आमच्याच राजकीय मतभेद जरूर आहेत. परंतु राजकीय मतभेद व कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात.
राजकारणात कोणीही कुटुंबातील नाती, जबाबदाऱ्या डावलू नये, या मताची मी आहे. आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत. त्यामुळे या दोन गोष्टीत गल्लत करू नये. जेथे राजकीय लढाईचा विषय येईल तेथे ती पूर्ण ताकदीने लढू, परंतु कुटुंबाचा विषय असेल तर राजकारण बाजूला ठेवू.
ही तर सरकारची दडपशाही
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ससूनमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, एक महिला ठामपणे ड्र्ग्ज विरोधात लढत असताना राज्यातील ट्रीपल इंजिनचे खोके सरकार दडपशाही करत आहे. दमदाटीची भाषा केली जात आहे. परंतु आम्ही अंधारे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत.
हेही वाचा

