

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्यात दोषी आढळल्याने ५ वर्षाची कारावासाची शिक्षा झालेले व सध्या मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी अखेर रद्द करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. २२ डिसेंबर पासून याचा प्रभाव असणार आहे. शुक्रवारी जेएमएफसी न्यायालयाने त्यांना या घोटाळ्यात पाच वर्षांच्या कारावासाची व १२.५० लाख रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे केदार यांच्यापुढे राजकीय संकट निर्माण झाले. तीन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा असल्याने त्यांना मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन प्रक्रिया करावी लागणार आहे. (Sunil Kedar)
सुमारे १५२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात न्यायालयाने त्यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदार सुधीर पारवे यांना देखील शिक्षा झाली पण तो कालावधी कमी होता. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी गेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भाजपने ही मागणी केली, कायदेशीर बाबी पूर्ण होताच हा निर्णय घेतला गेला. केदार यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात शिक्षेला स्थगिती तसेच आव्हान देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु असले तरी तीन दिवस सलग सुटी आहे. परिणामी केदार यांना काही दिवस मेडिकलमध्ये राहावे लागणार आहे. घशात इन्फेक्शन, मायग्रेनचा त्रास असल्याने उपचार सुरू आहेत. न्यायालयातून निघाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत रक्तदाब, डोकेदुखी व छातीत दुखत असल्याच्या त्यांच्या तक्रारीच्या आधारे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सावनेर मतदारसंघात काँग्रेस आमदार सुनील केदार यांचे भाजपकडून प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले माजी अध्यक्ष डॉ राजीव पोतदार, दुसरे दावेदार माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांनी पत्रपरिषदेतून या न्यायालयीन निर्णयाचे स्वागत केले होते व आमदारकी रद्द करण्याची मागणी लावून धरली. यामुळे अनेक वर्षानंतर भाजपला या मतदारसंघात पकड निर्माण करण्याची संधी आल्याचे बोलले जाते. दुसरीकडे केदार समर्थक भाजपचे मनसुबे कदापि पूर्ण होणार नाहीत, असा दावा करताना दिसत आहेत.
हेही वाचा :