

सूर्यकुमार यादव आणि इशान किशन मुंबई इंडियन्ससाठी न सुटणारे कोडे झाले आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सत्रात या दोघांकडून मुंबई इंडियन्सला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सूर्यकुमार यादव, इशान किशन या दोघांनी निराशा केली. याचा फटका मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत बसला. सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या खराब कामगिरीवर भारताचे महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी टीका केली. गावस्कर हे दोघेही वर्ल्डकप संघ निवडीनंतर निवांत झाले असल्याचे म्हणाले.
सुनिल गावस्कर म्हणाले, 'मला असे वाटते की सूर्यकुमार यादव, इशान किशन टीम इंडियात निवड झाल्यानंतर थोडे निवांत झाले आहेत. त्यांनी जे फटके खेळायला नकोत ते फटके ते खेळत आहे. मला असे वाटते की ते दोघे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना वाटते की आपण आता टीम इंडियाचे खेळाडू आहोत.'
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना सुनिल गावस्कर म्हणाले, 'कधी कधी असे होते की तुम्ही तुम्हाला स्वतःला थोडा वेळ देता आणि मग तुम्ही तुमच्या फटक्यांची योग्य निवड करता. मला असे वाटते की यंदाच्या आयपीएलमध्ये या दोघांकडून इथे चुका होत आहेत. त्यांची फटक्यांची निवड योग्य नाहीत. त्यामुळेच ते स्वस्तात बाद होत आहेत.'
इशान किशनने आयपीएल २०२१ मध्ये ८ सामन्यात १०७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी फक्त १३.२७ इतकी आहे. गेल्या हंगामात इशान किशनने १४ सामन्यात मुंबई इंडियन्सकडून ५१६ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी ५७.३३ इतकी चांगली होती. मात्र या हंगामात त्याला आपल्या खराब फॉर्ममुळे मुंबई इंडियन्समधील अंतिम अकरामधील आपली जागाही गमवावी लागली.
तर सूर्यकुमार यादव देखील यंदाच्या आयपीएलमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. यंदाच्या हंगामात त्याने १८.५० च्या सरासरीने २२२ धावा केल्या आहेत. त्याचा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक स्कोर हा ५६ आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन बरोबरच मुंबई इंडियन्समधील इतरही काही खेळाडू खराब फॉर्ममधून जात आहेत.
आज मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स बरोबर भिडणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. मुंबईसाठी प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी उरलेले दोन्ही सामने जिंकून केकेआरच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे. जर आजचा सामना मुंबई इंडियन्स हरली तर त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागणार आहे.
हेही वाचले का?