महेंद्रसिंह धोनी एकटाच संघर्ष करत नव्हता! प्रशिक्षक फ्लेमिंगचा बचाव - पुढारी

महेंद्रसिंह धोनी एकटाच संघर्ष करत नव्हता! प्रशिक्षक फ्लेमिंगचा बचाव

दुबई : पुढारी ऑनलाईन

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करताना धावांसाठी संघर्ष करताना दिसला. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात षटकार मारत महेंद्रसिंह धोनीने सामना संपवला होता. त्यावेळी जुना महेंद्रसिंह धोनी चाहत्यांना पहावयास मिळाला. मात्र गुणतालिकेत अव्वल स्थान अबाधित राखण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी धावांसाठी संघर्ष करताना दिसला. यावरुन धोनीवर टीकाही होऊ लागली आहे. सोशल मीडियावर धोनीची ही संथ खेळी चेष्टेचा आणि मीम्सचा विषय ठरली. मात्र चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग धोनीच्या समर्थनात पुढे आला आहे.

महेंद्रसिंह धोनीने २८ चेंडूत १८ धावांची संथ खेळी केली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला २० षटकात १३६ धावाच करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायडूने नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्याने धोनी बरोबर पाचव्या विकेटसाठी ७० धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र या भागीदारीत धोनीचा वाटा फारसा मोठा नव्हता. धोनीने २७ चेंडूत फक्त १८ धावा केल्या. त्याची सरासरी ६६.६६ इतकी होती. ज्यावेळी धावांची गती वाढवण्याची गरज होती त्यावेळी महेंद्रसिंह धोनी मोठे फटके मारण्यासाठी संघर्ष करत होता.

सामना झाल्यानंतर प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगने व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी त्याला धोनीच्या संथ खेळीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फ्लेमिंगने ‘आज फक्त धोनीच धावांसाठी संघर्ष करत नव्हता. या खेळपट्टीवर धावा करणे कठिण होते. या खेळपट्टीवर मोठे फटके मारणे सहज सोपे नव्हते. डावाच्या शेवटी दोन्ही संघ मोठे फटेक मारताना संघर्ष करत होते.’ असे उत्तर दिले.

विजयी धावसंख्येसाठी १० ते १५ धावा पडल्या कमी ( महेंद्रसिंह धोनी )

फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘कधी कधी तुम्ही खूपच मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवता. आम्हाला सामना जिंकण्यासाठी जवळपास १० ते १५ धावा कमी पडल्या. वेगवेगळ्या तीन मैदानावरील परिस्थिती जाणून घेणे सध्याच्या घडीचा अवघड जात आहे. आमच्या इराद्यात कोणतीही खोट नाही. आम्ही काही चुकांमध्ये सुधारणा करुन स्थैर्य प्राप्त करु.’

‘दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. शेवटच्या पाच षटकात त्यांनी सफाईदारपणे गोलंदाजी केली. त्यामुळे आम्हाला धावा करण्यात अडचणी आल्या.’ असे म्हणत फ्लेमिंग यांनी धोनीच्या संथ खेळीचे समर्थन केले.

दिल्लीने चेन्नईचा ३ विकेट्स राखून पराभव केला आणि गुणतालिकेत २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक ३९ धावा केल्या तर सामना अटीतटीचा झाला त्यावेळी शिमरोन हेटमायरने १८ चेंडूत २८ धावांची दमदार खेळी केली. याचबरोबर पदार्पण करणाऱ्या रिपल पटेलनेही २० चेंडूत १८ धावांची खेळी करुन शेवटच्या षटकापर्यंत हेटमायरला चांगली साथ दिली.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button