

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पवार कुटुंबाची दिवाळी एकत्रित होणार, कार्यक्रमाला ते एकत्र येणार, राजकारण वेगळे, कुटुंब वेगळे, असे खा. सुप्रिया सुळे सतत सांगत राहणार; मग आपणच एकमेकांचे शत्रुत्व गावागावाुत का वाढवत राहायचे? आपणही कौटुंबिक संबंध, नातीगोती, मैत्री जपूयात, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.बदललेल्या राजकीय समीकरणानंतरही पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल, असे नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राजकीय मतभेद वेगळे, कौटुंबिक जबाबदार्या वेगळ्या, राष्ट्रवादीत फूट पडलीच नाही, असे खा. सुप्रिया सुळे वारंवार बोलत असल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत.
संबंधित बातम्या :
त्यातच रविवारी (दि. 22) भिगवणजवळ विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे तर चक्क एकत्रित दिसल्याने शरद पवार यांच्या गटाच्या आणि अजित पवार यांच्या समर्थकांना दोन्ही पवारांचे आणि खा. सुप्रिया सुळे यांचे नक्की काय चालले आहे तेच समजेनासे झाले आहे.
सुळे यांच्या एक तर राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहेत. आमच्यातील काही सहकारी वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत गेले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. या वक्तव्यावर मग निवडणुक आयोगात, विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर काय सुरू आहे, पक्ष कसली कायदेशीर लढाई न्यायालयात व निवडणूक आयोगात लढतोय, अजित पवार कोणत्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुनील तटकरे कोणत्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत याचे उत्तर काही खा. सुळे देत नसल्याने काय करावे हे कार्यकर्ते, स्थानिक नेते यांना समजत नसल्याने त्याच्यात अस्वस्थता आहे.
जिल्ह्यात आज अजित पवार गटाला थेट अंगावर घेण्याची गरज असताना नेतृत्वाची भूमिकाच कार्यकर्त्यांना गुळमुळीत वाटू लागली आहे.
कौटुंबिक नाते म्हणून आम्ही एकत्र येऊ. पवार कुटुंबीयांची दिवाळी कालही एकत्र साजरी होत होती, आजही आहे आणि उद्याही ती होईल. आमच्याच राजकीय मतभेद जरूर आहेत. परंतु राजकीय मतभेद व कौटुंबिक जबाबदार्या वेगवेगळ्या असतात. राजकारणात कोणीही कुटुंबातील नाती, जबाबदार्या डावलू नये, या मताची मी आहे, या दोन गोष्टीत गल्लत करू नये. जेथे राजकीय लढाईचा विषय येईल तेथे ती पूर्ण ताकदीने लढू, परंतु कुटुंबाचा विषय असेल, तर राजकारण बाजूला ठेवू, या खा. सुप्रिया सुळे यांच्या शिकवणीप्रमाणेच आपण आपले राजकारण करू, एकमेकांना सांभाळून घेऊ, एक दुसर्याच्या फायद्याचे पाहू उगाच घरात, गावात, वस्तीत भांडणे, हाणामारी, आडवाआडवी नको अशी स्थानिक नेते, कार्यकर्ते यांची मानसिकता झाली आहे.