

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा, भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या मोकाट श्वानांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे भटक्या, मोकाट व पिसाळलेल्या श्वानांनी नागरिकांचा चावा (Street Dog Attack) घेतल्याच्या अनेक घटना शहरात घडत असतानाच पद्मानगर परिसरातील तीन वर्षीय चिमूरडीला पिसाळलेल्या श्वानाने पाठिवर चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी घडली आहे.
चांदनीकुमारी असे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. पद्मानगर येथील राजुचाळ परिसरात खेळत असतांना तिच्यावर कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. श्वानाच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पद्मानगर परिसरासह शहरातील भटक्या मोकाट श्वानांवर मनपा प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.पद्मानगर येथे मोठ्याप्रमाणात मोकाट, भटक्या प्राण्यांचा सुळसुळाट पसरला असून मागील दोन महिन्यापासून राजुचाळ परिसरात एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातलेले असून, पिसाळलेला कुत्रा दिवसरात्र परिसरातील लहान मुले, शाळेतील विद्यार्थी महिला, जेष्ठ नागरीकांच्या अंगावर जावून चावा चावा घेण्याच्या आहेत. बंदोबस्ताची मागणी होत आहे.
भिवंडी शहराची ओळख औद्योगिक वसाहतीचे शहर अशी आहे. लोकवस्ती वाढलेली असून काही ठिकाणी रस्त्यानजिक उघड्यावर कचरा, टाकाऊ अन्नपदार्थ रहिवासी फेकत असतात त्यामुळेच भटक्या श्वानांची संख्या येथे वाढत असून पालिकेने या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
हेही वाचा