पाळीव श्वानासाठी मालकाने घेतला चक्क बिबट्याशी पंगा ! बिबट्याला काठीने मारून वाचवला श्वानाचा जीव | पुढारी

पाळीव श्वानासाठी मालकाने घेतला चक्क बिबट्याशी पंगा ! बिबट्याला काठीने मारून वाचवला श्वानाचा जीव

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : वेळ मध्यरात्री २ वाजताची……….. घराच्या ओट्यावर झोपलेल्या पाळीव कुत्र्याचा अचानक केकाटण्याचा आवाज कानी पडताच मालकाला जाग येते, दरवाजा उघडल्यावर ओट्यावरील कुत्र्याचे मानगूट पकडलेला बिबट्या दृष्टीस पडताच दारामागची काठी हातात पकडून अत्यंत धाडसाने मालक बिबट्याच्या डोक्यात हाणतो…..  परिणामी बिबट्या बावचळून कुत्र्याची मानगूट सोडून धूम ठोकतो. ही घटना डिंगोरे (ता. जुन्नर) येथील गुरव गल्लीत घडली असून मोठ्या धाडसाने कुत्र्याचे संरक्षण करणाऱ्या मालकाचे सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे. राजेश उर्फ बच्चू सुधाकर आचार्य असे या कुत्रा मालकाचे नाव असून लहानपणापासून पाळलेल्या कुत्र्याबद्दलची मालकाची आत्मीयता यातून दिसून येते.

आता बिबटे गावातील गल्ल्यांमधूनही फेरफटका मारू लागले आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत, येथे यापूर्वी असंख्य पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केलेली उदाहरणे आहेत, तसेच डिंगोरेच्या हमरस्त्यावर दिवसाढवळ्या पिल्लासह बिबट मादीचा फेरफटका येथील नागरिकांनी अनुभवला आहे. डिंगोरेच्या आमले शिवाराच्या रोडवरील साई संतोष मंडलिक या लहानग्या मुलाला कुटुंबियांच्या समक्ष उचलून नेऊन ठार केल्याची काही वर्षांपूर्वीची दुर्घटना ताजीच आहे. तेव्हापासून बिबट्यांचे गाव म्हणून डिंगोरे राज्यभरात प्रसिद्ध झाले आहे. या सर्व बाबींचे अवलोकन करून वनखात्याने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी राजेश आचार्य व डिंगोरे ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले यांनी वन अधिकाऱ्यांना त्वरेने पिंजरा लावण्याची मागणी केल्याने ओतूर वनाधिकारी घटनास्थळी तातडीने हजर झाल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button