Stock Market Updates | शेअर बाजारात अस्थिरतेचे वारे, ॲक्सिस बँक, TCS आघाडीवर, झोमॅटोला झटका

Stock Market Updates | शेअर बाजारात अस्थिरतेचे वारे, ॲक्सिस बँक, TCS आघाडीवर, झोमॅटोला झटका
Published on
Updated on

Stock Market Updates : चीनमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव झाल्यामुळे आर्थिक वृद्धीला आणखी धक्का बसेल आणि जागतिक पुरवठा साखळीत अडथळा निर्माण होईल अशी चिंता गुंतवणूकदारांना लागून राहिली आहे. यामुळे मंगळवारी आशियाई शेअर बाजार घसरले. याचे पडसाद काही प्रमाणात भारतीय शेअर बाजारात उमटले. कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज मंगळवारच्या (दि.३) व्यवहारात भारतीय शेअर बाजारात अस्थिर वातावरण दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी घसरून ६१ हजारांवर गेला होता. तर निफ्टी १८,१७२ अंकावर होता. त्यानंतर शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीची वाटचाल स्थिर पातळीपर्यंत गेली. त्यानंतर सेन्सेक्स १२६ अंकांच्या वाढीसह ६१,२९४ वर बंद झाला. तर निफ्टी ३५ अंकांनी वाढून १८,२३२ वर स्थिरावला.

आर्थिक स्थितीतील वाढीचे मजबूत तिमाही अपडेट्स आणि बँकिंग व्यवस्थेतील तरलता वाढीच्या आशेने भारतीय शेअर्सने मंगळवारी तोटा मागे टाकून उच्च पातळीवर झेप घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्संना सर्वाधिक फायदा झाला. तर मेटल, एफएमसीजी, ऑटो निर्देशांकांत घसरण झाली.

झोमॅटोचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले

मुख्यतः आजच्या व्यवहारात झोमॅटोला मोठा फटका बसला. ऑनलाइन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर BSE वर मंगळवारच्या व्यवहारात झोमेटॉचा शेअर ४ टक्क्यांनी घसरून ५७.६५ रुपयांवर आला.

'हे' ठरले टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स

ॲक्सिस बँक (१.९२ टक्के वाढ), टीसीएस (१.४७ टक्के वाढ), टेक महिंद्रा (०.९३ टक्के वाढ), बजाज फायनान्स (०.७५ टक्के वाढ) आणि इंडसइंड बँक (०.६२ टक्के वाढ) हे सेन्सेक्सवरील टॉप गेनर्स होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टूब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मारुती टॉप टॉप लूजर्स ठरले. दुपारच्या सत्रात टाटा स्टील, एचडीएफसी, इन्फोसिस आदी सक्रिय स्टॉक्स होते.

क्षेत्रीय निर्देशांक नफ्याच्या दिशेने

कमकुवत सुरुवातीनंतर बहुतांश प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक नफ्याच्या दिशेने वळले. हेविवेट फायनान्सियल्स शेअर्स ०.४ टक्क्यांनी तर आयटी शेअर्स ०.५ टक्क्यांहून अधिक वाढले. CSB बँक, साउथ इंडियन बँक आणि कर्नाटक बँकचे शेअर्स ५ टक्के आणि ६.५ टक्क्यांदरम्यान वाढले. या बँकांच्या ठेवींमध्ये वाढ झाल्याच्या अहवालानंतर त्यांचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले. औषध निर्माता पिरामल फार्माचा शेअर बीएसईवर आजच्या व्यवहारात ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून १२६.७ रुपयांवर पोहोचला.

एनडीटीव्ही शेअर्समध्येही वाढ

दरम्यान, NDTV चे शेअर्स १.६ टक्क्यांनी वाढून ३४४.६५ रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी ग्रुपने घोषणा केली आहे की, ज्यांनी ओपन ऑफर अंतर्गत एनडीटीव्हीचे शेअर्स घेतले आहेत; त्यांना प्रति शेअर ४८.६५ रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाईल. या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीचे शेअर्स वधारले.

निफ्टी आयटी, बँक निर्देशांक वधारला

निफ्टी आयटी निर्देशांक ०.७७ टक्के वाढला. एमफेसिस, कोफोर्ज आणि एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस हे आघाडीवर होते. इंडसइंड बँक, बंधन बँक, फेडरल बँक यांच्या आघाडीमुळे निफ्टी बँक निर्देशांक ०.४ टक्के वाढला.

आशियाई बाजारातही घसरण

आशियाई बाजारातही आज घसरण झाली. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.१५ टक्क्याने घसरला, तर चीनचा मुख्य शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.४४ टक्क्याने खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक १.६ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई निर्देशांक ०.२ टक्क्यांनी घसरला. (Share Market Today)

विंडफॉल कर वाढवला

केंद्राने सोमवारी देशांतर्गत उत्पादित कच्चे तेल, एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि हाय-स्पीड डिझेलवरील विंडफॉल कर वाढवला. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कच्च्या तेलावरील विंडफॉल कर सध्याच्या १,७०० रुपयांवरून २,१०० रुपये प्रति टन करण्यात आला आहे. सुधारित करवाढ ३ जानेवारीपासून लागू होत आहे.

देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून ७४३.३५ कोटींच्या शेअर्सची खरेदी

सोमवारी बीएसई सेन्सेक्स ३२७ अंकांनी वाढून ६१,१६८ वर, तर निफ्टी ९२ अंकांनी झेप घेऊन १८,१९७ वर बंद झाला होता. NSE वरील आकडेवारीनुसार, सोमवारी २ जानेवारी रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २१२.५७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ७४३.३५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news