अर्थवार्ता- निफ्टीवर ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अर्थवार्ता- निफ्टीवर ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
Published on
Updated on

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 470.20 अंक व 1475.96 अंकाची घट होऊन निफ्टी 22023.35 व सेन्सेक्स 72643.43 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.09 टक्क्यांची तर सेन्सेक्समध्ये 1.99 टक्क्यांची घट नोंदवली गेली. निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांमध्ये टीसीएस (2.7 टक्के), ब्रिटानिया (1.7 टक्के), भारती एअरटेल (1.7 टक्के), एचडीएफसी लाईफ (1.7 टक्के), नेस्ले इंडिया (1.7 टक्के) या समभागांचा समावेश झाला तर सर्वाधिक घट होणार्‍या कंपन्यांमध्ये एनटीपीसी (-10.2 टक्के), टाटा स्टील (-9.9 टक्के), कोल इंडिया (-9.5 टक्के), पॉवर ग्रीड (-9.1 टक्के), टाटा मोटर्स (-9.0 टक्के) या समभागांचा समावेश झाला.

संबंधित बातम्या 

नुकतेच 'सेबी' या बाजार नियामक संस्थेने म्युच्युअल फंडांमध्ये स्मॉलकॅप व मेडकॅप प्रकारातील समभागांच्या वाढलेल्या किमती पडल्यास काही उपाययोजना आहे का याबद्दल विचारणा केली. यामुळे स्मॉल कॅप व मिडकॅप प्रकारातील गुंतवणूकदारांमधील घबराटीमुळे या निर्देशांकांची घसरण पाहावयास मिळाली. स्मॉल कॅप 2640.82 अंक तर मिडकॉप 1602.41 अंकांनी (एकूण) कोसळला.

सेबीने स्मॉल कॅप व मिडकॅपच्या वाढलेल्या किमतीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर सर्व म्युच्युअल फंडांनी आपल्या या प्रकारातील पोर्टफोलिओची 'स्ट्रेस टेस्ट' घेतली. ही एक प्रकारची परीक्षा असून यामध्ये मार्केट घसरणीस लागल्यास संबंधित फंड मॅनेजरला आपला पोर्टफोलिओमधील स्टॉक्स (समभाग) विकून (Liquidate करून) किती दिवस लागतील याचा आढावा घेतला गेला. याचे परिणाम (रिझल्ट) 15 मार्च रोजी पुढे आले.

निप्पॉनसारख्या सर्वात मोठ्या स्मॉल कॅप फंडाला 50 टक्के पोर्टफोलिओ मोकळा करण्यास (Liquidate ) 27 दिवस तर एचडीएफसी स्मॉल कॅपला 42 दिवस तसेच सरकारी एसबीआय स्मॉल कॅप फंडाला 60 दिवस लागतील. कमीत कमी दिवसांत पोर्ट फोलिओ मोकळा करता येणे. (Liquidate) हे या परीक्षांमध्ये अपेक्षित असते. याचप्रमाणे मिडकॅप प्रकारातदेखील अशीच परीक्षा घेण्यात आली. या सर्वांचे निकाल गुंतवणूकदार संबंधित म्युच्युअल फंडाच्या बेसाईटवर अथवा गुगलवर शोधू शकतात.

बर्‍याच काळाच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने विद्युत वाहनांच्या (EV) निर्मितीबाबतचे धोरण (Policy) मंजूर केली. या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी टेस्लाचा भारतात येण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला. यामध्ये 50 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांना आयात शुल्कात डॉलर्स सवलत मिळू शकेल. 80 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करणार्‍या परदेशी कंपन्यांना 40 हजार विद्युत वाहने भारतात आणता येणार; परंतु हे करताना प्रकल्प उभारणी आधी संबंधित कंपनीला बँकेचे हमीपत्र (बँक गॅरंटी) देणे बंधनकारक असेल.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची उपशाखा सोशल स्टॉक एक्स्चेंजवर सेवाभावी संस्थांना निधी उभारणीची संधी. 5 सेवाभावी संस्थांनी एकूण 8 कोटींचा निधी या माध्यमातून उभा केला. यासाठी ज्याप्रमाणे एनएसईमध्ये कंपनीचा 'आयपीओ' आणला जातो. त्याचप्रमाणे 'एसएसई'मध्ये सेवाभावी संस्थेचा एनपीओ आणला जातो. शिक्षण, कृषी, महिला विकास, कौशल्यविकास, जीवनमान सुधारणे या कारणांसाठी हा निधी वापरला जाणार. सध्या 50 पेक्षा अधिक (नोंदणीकृत) 'एनपीओ' (नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन) 'एसएसई'वर सहभाग आहे.

इंडिगो एअरलाईन्सचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांनी इंटरग्लोब एव्हिएशनमधील 5.83 टक्के हिस्सा 6786 कोटींना विकला. प्रत्येक 7.5 दशलक्ष समभागांची 3 टक्क्यांमध्ये खुल्या बाजारात विक्री करण्यात आली. प्रत्येक टप्प्यातील विक्री किंमत 2262 कोटींची होती. 3015.10 ते 3016.36 प्रतिसमभाग दरांवर समभाग विक्री करण्यात आली. यापैकी 633 कोटींचे समभाग (2.1 दशलक्ष समभाग) मॉर्गन स्टॅन्ले एशिया या कंपनीने खरेदी केले.

फेब्रुवारी महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दर (सीपीआय इन्फ्लेशन) 5.09 टक्क्यांवर पोहोचले. जानेवारी महिन्यात भारताच्या औद्योगिक प्रगतीचे निदर्शक असलेला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन (आयआयपी) निर्देशांक 3.8 टक्क्यांवर आला. डिसेंबर महिन्यात हा निर्देशांक 4.2 टक्के होता. फेब्रुवारी महिन्यात प्रामुख्याने अन्नधान्य महागाई दरात वाढ झाली. अन्नधान्य महागाई दर 8.66 टक्क्यांवर पोहोचला. व्याजदर कपात करण्याआधी सध्या तरी रिझर्व्ह बँकेने महागाई दर आणखी नियंत्रणात आणण्याचे धोरण अवलंबले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतील महागाई दर फेब्रुवारीमध्ये 3.3 टक्क्यांवर पोहोचला.

भारताची गंगाजळी वाढवण्याच्या उद्देशाने तसेच रुपया चलनाला इतर चलनांच्या तुलनेत भविष्यात सुरक्षितता आणि स्थिरता (hedging) देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेने जागतिक बाजारातून जानेवारी महिन्यात तब्बल 8.7 टन सोन्याची खरेदी केली. जुलै 2022 नंतरची ही सर्वात मोठी खरेदी आहे. यामुळे भारताचा सोन्याचा साठा (gold reserve) 803.58 टनांवरून 812.3 टनांवर पोहोचला.

निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्टेट बँकेने जाहीर केला. चेन्नईमधील लॉटरी कंपनी असलेल्या मार्टिन्ज फ्युचर गेम्स अँड हॉटेल सर्व्हिसेसने 1368 कोटींचे सर्वाधिक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. माहिती जाहीर करताना स्टेट बँकेने रोख्यांना दिलेले विशिष्ट क्रमांक (अल्फान्युमरिक नंबर) जाहीर केले नव्हते. हे क्रमांक देखील जाहीर करणे आवश्यक होते, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

आता या प्रकरणी 18 मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. सध्या रोखे खरेदी करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांची यादी आणि दुसरी यादी रोख्यांद्वारे राजकीय पक्षाला मिळालेली रक्कम या दोन वेगळ्या याद्या प्रस्तुत करण्यात आल्या; परंतु विशेष क्रमांक (अल्फा न्युमरिक नंबर) जाहीर झाल्यास कोणी किती रोखे खरेदी करून कोणत्या पक्षाला किती रक्कम दिली हे स्पष्ट होऊ शकेल.

पॅरामाऊंट ग्लोबल ही आंतरराष्ट्रीय कंपनी वृत्तसेवा पुरवणार्‍या व्हायकॉम 18 कंपनीमधील 13.01 टक्के हिस्सा रिलायन्सला विकणार. 4286 कोटींमध्ये हिस्साविक्री केली जाणार. या खरेदीपश्चात रिलायन्सचा व्हायकॉम 18 मधील हिस्सा 57.48 टक्क्यांवरून 70.49 टक्क्यांवर पोहोचेल.

ब्रिटिश अमेरिकन टोबॅको (बॅट) या आंतरराष्ट्रीय कंपनीने आयटीसी या भारतीय कंपनीमधील 3.5 टक्के हिस्सा 17485 कोटींना विकला. एकूण 43.68 कोटी समभागांची विक्री करण्यात आली. सरासरी 400.25 रुपये किमतीवर समभाग विक्री झाली.

टाटा मोटर्सने तामिळनाडू सरकारसोबत सामंजस्य करार केला. पुढील पाच वर्षांत 9 हजार कोटींच्या गुंतवणुकीसह राज्यात वाहननिर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे सुमारे 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.

8 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी तब्बल 10.5 अब्ज डॉलर्सनी वधारून मागील दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 636.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news