अर्थवार्ता : गतसप्ताहात 'निफ्टी- सेन्सेक्स'ची घसरण, कारणे काय? | पुढारी

अर्थवार्ता : गतसप्ताहात 'निफ्टी- सेन्सेक्स'ची घसरण, कारणे काय?

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 71.30 अंक व 490.14 अंकांची घट नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये 0.33 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.68 टक्क्यांची घट झाली. निफ्टीने 21782.5 अंक, तर सेन्सेक्सने 71595.49 अंकांच्या पातळीवर बंद भाव दिला. सर्वाधिक वाढ दर्शवणार्‍या समभागांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (11.6), बीपीसीएल (10.0 टक्के), कोलइंडिया (8.7 टक्के), सनफार्मा (8.3 टक्के), टीसीएस (4.2 टक्के) या कंपन्यांचा समावेश होतो. तसेच सप्ताहा दरम्यान सर्वाधिक घट दर्शवणार्‍या समभागांमध्ये यूपीएल (-18 टक्के), आयटीसी (-5.7 टक्के), बजाज फिनसर्व्ह (-4.9 टक्के), कोटक महिंद्रा बँक (-4.4 टक्के), ब्रिटानिया (-3.4 टक्के) यांचा समावेश होतो. या सप्ताहात रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक झाली. यामध्ये देशातील व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय झाला. सध्या रिझर्व्ह बँकेने रेपो रेटचा दर 6.5 टक्क्यांवर ठेवल्याने भांडवल बाजाराची काही प्रमाणात निराशा झाला. या घोषणेमुळे तूर्तास तरी कर्जाचा व्याजदर कमी होण्याची आशा मावळली आहे. महिन्याच्या सुरुवातीला अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. यामध्ये फिस्कलडेलिसिट (वित्तीय तूट) (म्हणजेच सरकारला मिळणारा महसूल आणि संस्कार कडून केला जाणारा खर्च) आटोक्यात ठेवण्याचे सूतोवाच केले होते. ही तूट आटोक्यात आल्यावर किरकोळ महागाई दर कमी होऊन मग व्याजदर कमी करण्याची आशा निर्माण होईल. आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटच्या तिमाहीत भारतात किरकोळ महागाई दर (सीपीआय इनफ्लेशन) 5 ते 5.2 टक्क्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी याच तिमाहीत हा महागाई दर 4.7 टक्के असण्याचा अंदाज आहे.

* देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी ‘एलआयसी’ चे निव्वळ नफा चालू अर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत 50 टक्के वधारून 6,334 कोटींवरून 9444 कोटींवर पोहोचला. नॉनपार्टीसिपेंटिंग फंडचा आकडा बघता एलआयसीने आपल्या भागधारकांना 7,692 कोटींचा निधी हस्तांतरित केला.

* भारतीय भांडवल बाजारामध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. इक्विटी प्रकारात जानेवारी महिन्यात विक्रमी 18 हजार पेक्षा अधिक कोटींची गुंतवणूक करण्यात आली. मागील दोन वर्षांचे विक्रम मोडीत काढत एकूण 18,838.33 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. स्मॉल कॅपमध्ये 3,256.98 कोटी, थिमॅटिक फंडस्मध्ये 4,804.69 कोटी, तर मल्टिकॅपमध्ये 3,038.67 कोटींची गुंतवणूक झाली.

* आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासीमचा चालू आर्थिक वर्षाचा तिसर्‍या तिमाहीचा नफा 40 टक्केघटून 1,514 कोटींवर खाली आला. कंपनीच्या महसुलात 1,106 टक्यांची वाढ होऊन महसूल 28,638 कोटींवरून 31,965 कोटींवर पोहोचला.

* ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी टाटा पॉवरचा तिसर्‍या तिमाहीचा नफा किरकोळ वधारून 1,052 कोटींवरून 1,076 कोटी झाला. महसुलात 4 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 14,129 कोटींवरून 14,651 कोटी झाला. निव्वळ नफ्यामध्ये सातत्याने वाढ होण्याची ही 17 वी वेळ आहे. मागील 17 तिमाहींमध्ये कंपनीच्या नफ्याने सातत्याने वाढ दर्शवली आहे. या कंपनीने अपेक्षेनुसार उत्तम कामगिरी केल्याचे बाजार विश्लेषकांचे मत.

* टाटा समूहाच्या शिरपेचात मानाचा तुरा. टाटा समूहाच्या कंपन्यांच्या एकत्रित भांडवल बाजारमूल्याने तब्बल 30 लाख कोटींचा आकडा पार केला. 1 जानेवारी 2020 च्या दिवशी 11.6 लाख कोटी असलेले बाजार भांडवलमूल्य (मार्केट कॅप) केवळ चार वर्षांत तिप्पट झाले. यामध्ये सर्वाधिक भांडवल बाजारमूल्य टीसीएसचे म्हणजे सुमारे 15 लाख कोटी असून यानंतर टाटा मोटर्स (3.43 लाख कोटी), टायटन (3.15 लाख कोटी), टाटा स्टील (1.79 लाख कोटी), टाटा पॉवर (1.25 लाख कोटी) यांचा क्रमांक लागतो.

* देशातील महत्त्वाची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचा तिसर्‍या तिमाहीचा नफा तब्बल 82 टक्क्यांनी वधारून 2,442.2 कोटींवर पोहोचला. दूरसंचार कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारे महत्त्वाचे एकक म्हणजे प्रतिग्राहक सरासरी महसूल होय. (Average Revenve per user). या तिमाहीत एअरटेलचा प्रतिग्राहक सरासरी महसूल 203 रुपयांवरून 2.5 टक्के वधारून 208 रुपये झाला. या कंपनीचे प्रतिस्पर्धी जिओ कंपनीचा प्रतिग्राहक सरासरी महसूल 182 रुपये, तर व्होडाफोन-आयडियाचा महसूल केवळ 145 रुपये आहे. एअरटेलचा एकूण महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 2.3 टक्के वधारून 37,899.5 कोटी झाला.

* सरकारी कंपनी पेट्रोनेट एलएनजीने कतारच्या ‘कतार एनर्जी’सोबत 78 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 6 लाख 42 हजार कोटी रुपये) करार केला. यामध्ये पेट्रोनेट एलएनजी कंपनी कतारकडून दरवर्षी 75 लाख टन द्रवरूपातील नैसर्गिक वायू 2028 पासून पुढील 20 वर्षांसाठी खरेदी करणार. या द्रवरूपातील वायूला प्रक्रिया करून 60 टक्के गेल कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला 30 टक्के, तर भारत पेट्रोलियमला 10 टक्के हिस्सा वाटप करून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार. गोव्यामध्ये चालू असणार्‍या इंडिया एनर्जी विक परिषदेमध्ये याची घोषणा करण्यात आली.

* नजीकच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर चीप बनवण्याच्या प्रकल्पांना केेंद्र सरकारकडून मान्यता मिळणार. एकूण 13 हजार कोटींचे प्रकल्प मान्यतेसाठी प्रतीक्षेत. यामध्ये कायनेस टेक, सीजी पॉवर, ‘फॉक्सकॉन’ आणि ‘एचसीएल’चा एकत्रित प्रकल्प, हिरानंदानी समूह यांचे प्रकल्प मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिकेच्या मॅक्रॉन कंपनीच्या 22,516 कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला याआधी मान्यता मिळाली आहे. या योजनेंतर्गत प्रकल्प मंजूर झाल्यास प्रोत्साहन योजनेंतर्गत 50 टक्के सबसिडी मिळू शकणार आहे. सेमीकंडक्टर चीप बनवण्याच्या क्षेत्रात आयटी क्षेत्राप्रमाणे भारताचा जागतिक पातळीवर दबदबा निर्माण करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशनची घोषणा करण्यात आली. हे सर्व प्रकल्प लवरच कार्यान्वित होतील.

* एनएससी (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार. बर्‍याच वेळा सूक्ष्म, मध्यम, लघू स्वरूपाच्या उद्योगांना भांडवलाची समस्या भेडसावते. भांडवलबाजारात कंपनी सूचीबद्ध करून भांडवल उभारणीची सोय आहे; परंतु याबाबत उद्योजकांना मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या) सहकार्याने शिबिरे, ज्ञानसत्र, कार्यशाळा, रोड शोचे आयोजन केले जाणार. यासाठी एनएसईचा इमर्ज हा प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार. आजपर्यंत इमर्ज प्लॅटफॉर्मद्वारे 424 एमएसएमई (सूक्ष्म/लघू/मध्यम उद्योगांनी) 8,836 कोटी रुपये उभे केले आणि यांनी 1 लाख कोटी बाजार भांडवलाचा महत्त्वाचा टप्पा पार केला. प्रामुख्याने लघू, मध्यम व सूक्ष्म उद्योगांना भांडवल उभारणीसाठी सरकारी, खासगी अथवा सहकारी बँका यांचे कर्ज किंवा खासगी वित्तसंस्था (एनडीएफसी) यांचे कर्ज याशिवाय निधी उभारणीचा मार्ग माहिती नसतो. परंतु, अपेक्षित नियम व कागदपत्रांची पूर्तता करून बाजार नियामक सेबीची परवानगी घेऊन कायदेशीररीत्या आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणीचा पर्याय उपलब्ध आहे.

* देशातील महत्त्वाची दुचाकी कंपनी हिरोमोटोकॉर्पचा चालू आर्थिक वर्षाचा तिसर्‍या तिमाहीचा नफा 51 टक्के वधारून 1073.38 कोटी झाला. कंपनीचा महसूल 21 टक्के वधारून 9723.73 कोटी झाला. नेट प्रॉफिट मार्जिनदेखील 8.9 टक्क्यांवरून 11 टक्के झाले.

* 2 फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 5.186 अब्ज डॉलर्सनी वधारून 622.469 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

Back to top button