Stock Market Closing | शेअर बाजाराचा मूड पॉझिटिव्ह! सेन्सेक्सची हजार अंकांची उसळी, गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फायदा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

Stock Market Closing : जागतिक स्तरावरून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज शुक्रवारी (दि.३) उसळी घेतली. कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) एक हजार अंकांनी वाढला. तर निफ्टी (Nifty) १७,६०० च्या वर गेला. त्यानंतर सेन्सेक्स ८९९ अंकांनी वाढून ५९,८०८ वर बंद झाला. तर निफ्टी २७२ अंकांनी वाढून १७,५९४ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात रिलायन्स, बँकिंग आणि आयटी स्टॉक्सनी आघाडी घेतली. PSU बँका आणि अदानी स्टॉक्सनी उसळी घेतल्याने सर्व क्षेत्रांत चौफेर खरेदी दिसून आली. या शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ४ लाख कोटींचा फायदा झाला.

हे टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर एसबीआय, इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स होते. ते १.५ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. एनटीपीसी, आयटीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि एचसीएल टेक हे शेअर्सदेखील वाढले. सन फार्मा आणि एशियन पेंट्स हे घसरले. निफ्टी मेटल १.७० टक्क्याने वधारला. निफ्टी आयटी आणि निफ्टी FMCG हे देखील वाढले. निफ्टी मेटल सुमारे ३ टक्क्यांने वाढला.

अदानींचे शेअर्स तेजीत, बाजार भांडवलात ५० हजार कोटींची वाढ

अदानींच्या शेअर्समध्ये आज वाढ दिसून आली. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर १३ टक्क्यांपर्यंत वाढला. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉ‍वर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी विल्मर यांना ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. अमेरिकेतील GQG पार्टनर्स सोबतच्या १५ हजार कोटी रुपयांच्या करारानंतर अदानी स्टॉक्सचे एकत्रित बाजार भांडवल आज सुमारे ५० हजार कोटी रुपयांनी वाढले. यामुळे अदानींच्या सर्व १० शेअर्सचे बाजार भांडवल ८.३ लाख कोटींवर पोहोचले. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या स्टॉक्सनी १० लाख कोटी बाजार भांडवल गमावले आहे.

बँकिंग स्टॉक्स तेजीत, हे आहे कारण

आज बँक स्टॉक्स सर्वाधिक वाढ झाली. बीएसईवर PSU बँक निर्देशांक १० टक्क्यांपर्यंत वाढला. पंजाब अँड सिंध बँक हा बँकिंगमध्ये टॉप गेनर्स होता. हा शेअर सुमारे १० टक्के वाढून २९.१२ रुपयांवर पोहोचला. युको बँक, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र सुमारे ५ टक्क्यांनी वाढले. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे ३ टक्क्यांपर्यंत वाढले. PSU स्टॉक्सवर गेल्या दोन महिन्यांपासून दबाव राहिला होता. दरम्यान, गौतम अदानी यांनी अमेरिकेतील GQG पार्टनर्सची १५,४४६ कोटी रुपयांचा करार केल्याचे जाहीर केल्यानंतर PSU बँक स्टॉक्स वधारले. (Stock Market Closing)

आशियाई बाजारही वधारले

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक वाढून बंद झाले आहेत. डाऊ जोन्स निर्देशांक १ टक्के वाढला. या पार्श्वभूमीवर आज आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले. जपानचा निक्केई आज ३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. निक्केई सुरुवातीच्या व्यवहारात १.४५ टक्के वाढून २७,८९८ वर गेला. हाँग काँगचा हँग सेंग निर्देशांक १ टक्के वाढला. टॉपिक्स निर्देशांक १.२६ टक्के वाढून २,०१९ वर होता.

दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ०.३२ टक्के वाढून ८२.३३ वर पोहोचला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news