

अयोध्या : पुढारी ऑनलाईन; भगवान रामाची नगरी असलेल्या अयोध्येत (Ayodhya) १४ कोसी परिक्रमा मंगळवारी दुपारी १२.४८ वाजता सुरू झाली होती. दरम्यान, मध्यरात्री १.३० वाजता कोसी परिक्रमेदरम्यान हनुमान गुहेजवळ चेंगराचेंगरी झाली. तसेच गर्दीत गुदमरल्याने अनेक भाविक बेशुद्ध पडले. यामुळे डझनभर लोक जखमी झाले आहेत. यातील ५ महिलांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेंगराचेंगरी झाल्याने गर्दीत श्वास घेण्यास काही ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. येथे चेंगराचेंगरी झाल्याने काही नागरिक जखमी झाले आहेत. ५ गंभीर जखमी महिलांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर राम नगरीला प्रदक्षिणा घातली जाते. राम नगरीत प्रामुख्याने तीन परिक्रमा होतात. सर्वात मोठी प्रदक्षिणा ही चौदा कोसांची असते; जी चैत्र पौर्णिमेपासून होते. त्याचवेळी, दुसरी प्रदक्षिणा १४ कोसांची असते जी कार्तिक महिन्यात होते. तिसरी परिक्रमा म्हणजे पंचक्रोशी परिक्रमा जी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला होते.
१४ कोसी परिक्रमेत दूरदूरवरून भाविक, संत-महंतांसह आसपासच्या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. याची अशी आख्यायिका आहे की, १४ कोस प्रदक्षिणा केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच परिक्रमा मार्गाची व्यवस्था करण्याच्या सूचना कार्यकारी संस्थेला दिल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना परिक्रमा परिसरात भाविकांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
अयोध्येत (Ayodhya) रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. मंदिराच्या उभारणीमुळे येथे भाविकांची संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत यंदा २५ ते ३० लाख भाविक परिक्रमा करण्यासाठी रामनगरीत पोहोचले असल्याचा अंदाज आहे, त्यादृष्टीने प्रशासनाने परिक्रमेशी संबंधित व्यवस्था केली आहे. संपूर्ण न्यायदंडाधिकाऱ्यांना सेक्टर आणि झोनमध्ये विभागून सेक्टर मॅजिस्ट्रेट नियुक्त केले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी परिक्रमा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केले आहेत.
हे ही वाचा :