मेलबर्न ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांनी एका कौटुंबिक अंत्यसंस्कार कार्यक्रमात अखेरचा निरोप दिला. यावेळी शेन वॉर्न याची जॅक्सन, ब्रुक आणि समर ही तिन्ही मुले उपस्थित होती. तसेच त्याचे आई-वडील किथ आणि ब्रिजिट देखील उपस्थित होते. याशिवाय प्रमुख 80 पाहुण्यांनीही यावेळी हजेरी लावली होती.
वॉर्नवर 30 मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शेन वॉर्नचे काही दिवसांपूर्वी मित्रांसोबत थायलंडला सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. तेथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे थायलंडमध्येच निधन झाले. आठवडाभरापूर्वी थायलंडहून त्याचे पार्थिव ऑस्ट्रेलियात आणण्यात आले होते.
शेन वॉर्नचा जवळचा मित्र एडी मॅग्वायर याने त्याचे स्तवन (यूलॉजी) वाचले. अंत्यसंस्काराच्या वेळी तो मास्टर ऑफ सेरेमनी देखील होता. मुराबिनमध्ये हा अंत्यसंस्कार सोहळा पार पडला.
वॉर्नच्या अंत्ययात्रेला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मार्क टेलर, अॅलन बॉर्डर, मायकेल क्लार्क, अँड्र्यू सायमंडस्, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मर्व्ह ह्युजेस, ग्लेन मॅकग्रा, मार्क वॉ आणि इयान हिली यांचा यामध्ये समावेश होता.
शेन वॉर्न वर 30 मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसामान्यांनाही सहभागी होता येणार आहे. हे अंत्यसंस्कार मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहेत. यावेळी एमसीजीच्या ग्रेट सदर्न स्टँडला शेन वॉर्नचे नाव देण्यात येणार आहे.