मयंक इंग्लंडला रवाना ; बीसीसीआयचा बॅकअप प्लॅन

मयंक इंग्लंडला रवाना ; बीसीसीआयचा बॅकअप प्लॅन
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल इंग्लंडला रवाना झाला असून, तो भारतीय कसोटी संघात सामील होणार आहे. रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने बीसीसीआयने मयंकला त्याचा बॅकअप म्हणून इंग्लंडला पाठवले आहे, तर जसप्रीत बुमराहकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होणार आहे.

लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी रोहित शर्माने फलंदाजी केली. मात्र, त्यानंतर त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. रोहित 1 जुलैपर्यंत फिट होण्याची शक्यता असली, तरी बीसीसीआयने 31 वर्षांच्या मयंक अग्रवालला इंग्लंडला रवाना केले आहे. मयंकला इंग्लंडविरुद्धचा कसोटी संघ जाहीर झाला त्यावेळी संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, आधी के. एल. राहुलला झालेली गंभीर दुखापत आणि त्यानंतर रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मयंकची संघात वर्णी लागली.

बीसीसीआयने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मयंक अग्रवाल इंग्लंडसाठी रवाना झाला. तो रोहितचा बॅकअप म्हणून संघात असेल. गरज लागली तर तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातदेखील खेळेल. यूकेमध्ये सध्या कोरोनाविषयक खबरदारीचे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मयंकची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली, तर त्याला कोणत्याही विलगीकरणात राहावे लागणार नाही.

रोहित कोरोनामुक्‍त होऊ शकतो

रोहित शर्मा कोरोनाच्या दुष्टचक्रातून मोकळा होऊन एजबस्टन मैदानावर भारताचे नेतृत्व करायची शक्यता आहे. कसोटीची योग्य तयारी करायच्या चांगल्या उद्देशाने भारतीय संघ अगोदर इंग्लंडला आला. त्याच तयारीचा भाग म्हणून लिसेस्टरशायर मैदानावर भारतीय संघ सराव सामन्याकरिता उतरला. पहिल्या डावात फलंदाजी केल्यावर अत्यंत सौम्य लक्षणे दिसू लागल्याने रोहितची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्याला कमी क्षमतेची कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. पाच दिवस विलगीकरणात घालवून योग्य उपचार करून रोहितला 29-30 तारखेला परत चाचणीकरिता नेण्याचा विचार आहे. तो कोरोनामुक्‍त होऊ शकला नाही, तर जसप्रीत बुमराकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news