अल्टिमेट खो-खो : तेलगू योद्धाज् संघाचा सलग दुसरा विजय

अल्टिमेट खो-खो : तेलगू योद्धाज् संघाचा सलग दुसरा विजय

पुणे : वृत्तसंस्था : पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत तिसर्‍या दिवशी मंगळवारी आदर्श मोहितेच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर तेलगू योद्धाज् संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 21 गुणांच्या फरकाने पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मोहिते याने 3 मिनिटे 43 सेकंद संरक्षण करताना आक्रमणात 10 गडी बाद करून तेलगू योद्धाज् संघाने राजस्थान वॉरियर्स संघावर 68-47 असा विजय मिळवला.

प्रसाद राद्ये याने 13 गुणांची नोंद करताना मोहितेला उत्कृष्ट साथ दिली. तसेच रोहन शिंगोटेने 10 गडी टिपताना तेलगू योद्धाज्च्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. राजस्थान वॉरियर्स कर्णधार मझहर जमादारने 17 गुणांची नोंद करताना एकाकी झुंज दिली. सुशांत काळढोणे याने 4 गडी बाद करून 9 गुणांची कमाई केली.

याआधी, राजस्थान वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून बचाव स्वीकारला. तेलगू योद्धाज् संघाने दोन खेळाडू वझीरात रूपांतर करताना पावर प्लेची जोरदार सुरुवात केली.

राजस्थानच्या अक्षय गणपुले आणि गोविंद यादव यांनी तेलगू योद्धाज् संरक्षणाची कसोटी पहिली आणि 2 बोनस गुणही मिळवले. परंतु, तेलगू योद्धाज् संघाने राजस्थानची पहिली तुकडी 2 मिनिटे 36 सेकंदात तंबूत परतावली व 24-02 अशी आघाडी घेतली. राजस्थानने आक्रमणात चांगली कामगिरी करताना प्रत्युत्तर दिले. परंतु, मोहितेने नाबाद 3 मिनिटांचे संरक्षण करताना तेलगू योद्धाज्ला पहिल्या डावात 30-20 अशी आघाडी मिळवून दिली. तेलगू योद्धाज्ने दुसर्‍या डावातील पहिल्या 7 मिनिटात 36 गुण मिळवताना सामन्यावर घेतलेली पकड कायम राखली. तेलगू योद्धाज् संघाने आपली आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news