

Henry Olonga cleaning boats singing on cruise in Australia
नवी दिल्ली : 1990 च्या दशकात झिम्बाब्वेचा क्रिकेट संघातून खेळणारा गोलंदाज हेन्री ओलोंगा याला भारतीय क्रिकेटप्रेमी कधी विसरू शकणार नाहीत. 1998 मध्ये शारजा येथे झालेल्या कोका-कोला कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिनने ओलोंगाच्या गोलंदाजीवर चोप चोप चोपले होते. सचिनने त्याच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली होती. त्यामुळेच ओलोंगा चर्चेत आला होता.
त्या संस्मरणीय सामन्यात तेंडुलकरने 92 चेंडूत नाबाद 124 धावा करत भारताला 10 गडी राखून विजय मिळवून दिला होता तर ओलोंगाने फक्त 6 षटकांत 50 धावा दिल्या होत्या. तेव्हाचा हा झिम्बाब्वेचा जलदगती गोलंदाज हेन्री ओलोंगा आता पुन्हा चर्चेत आला आहे.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जल्लोषात मैदान गाजवणारा हाच ओलोंगा आता क्रूझ शिपवर गाणं गातो, रिटायरमेंट व्हिलेजेसमध्ये, शाळांमध्ये, बारमध्ये केवळ दोन-तीन प्रेक्षकांसमोरही गाणं गातो. बोटींवर क्लिनिंगसाठी जातो आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणूनही काम करत आहे. 'टेलिग्राफ'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
क्रिकेटर हेन्री ओलोंगाचं आयुष्य केवळ क्रिकेटपुरतंच मर्यादित राहिलं नाही.
2003 साली विश्वचषक स्पर्धेदरम्यान ओलोंगा आणि अँडी फ्लावर हे झिम्बाब्वेचे दोन खेळाडू देशाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या हुकूमशाहीविरुद्ध निषेध नोंदवत "लोकशाहीचा मृत्यू" या आशयाचे काळे रिबिन बांधून मैदानात उतरले.
या निषेधामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आणि अखेर ओलोंगाला देश सोडून पलायन करावं लागलं.
झिम्बाब्वे सोडल्यानंतर ओलोंगा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. तिथे ओलोंगाने संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये ‘द व्हॉइस ऑस्ट्रेलिया’ या रिऍलिटी शोमध्येही त्यांनी भाग घेतला.
पण या करिअरमध्ये त्याचा तितकासा जम बसला नाही. सध्या तो स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवतो. तसेच अधूनमधून गायकीचे कार्यक्रम करतो.
ओलोंगा आता क्रूझ शिपवर गाणं गातो, रिटायरमेंट व्हिलेजेसमध्ये, शाळांमध्ये, बारमध्ये केवळ दोन-तीन प्रेक्षकांसमोरही गाणं गातो.
तो म्हणतो, "मी संगीतासाठी गातो, प्रसिद्धीसाठी नाही. लोकांना काहीही वाटू दे, मला त्याचा अभिमान वाटतो. मी नौका स्वच्छ करण्यापासून ते मोटिव्हेशनल स्पीच देण्यापर्यंत अनेक कामं केली आहेत.
मला कोणत्याही प्रकारचं भांडवलशाहीने झाकलेलं जीवन नको आहे. माझं आयुष्य हे सरळ आणि प्रामाणिक आहे."
ओलोंगा अजूनही झिम्बाब्वेला परत गेलेला नाही. 20 वर्षांहून अधिक काळ त्याने वडिलांनाही पाहिलेलं नाही. ते अद्यापही झिम्बाब्वेतील बुलावायो येथे राहतात.
रॉबर्ट मुगाबे यांचे 2019 मध्ये निधन झाल्यानंतर आणि 2017 मध्ये त्यांची सत्ता कोसळल्यानंतर ओलोंगा याने झिम्बाब्वेला परत जाण्याचा विचार केला होता, पण हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
“माझं जीवन आता इथंच आहे. मी ऑस्ट्रेलियात राहतो, जिथे माझं सगळं व्यवस्थित चालतं. मी आता वेस्टर्न विचारसरणीचा झालो आहे,” असं ओलोंगा सांगतो.
मास्टर ब्लास्टर सचिनने चोपलेला या गोलंदाजाचं आयुष्य संघर्ष, त्याग आणि आत्ममूल्यांच्या जाणीवेचं प्रतीक बनलं आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
एक क्रिकेट स्टार ते राजकीय निर्वासित आणि शेवटी एक कलाकार – हा ओलोंगाचा प्रवास सहज सोपा नक्कीच नाही. ओलोंगा म्हणतो, "मी कधीही खोटं जगलो नाही. हे आयुष्य असं असलं तरी, ते खरं आहे."
झिम्बाब्वेमधील कारकिर्दीत त्याने एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. त्यातील ओळी त्याच्या सध्याच्या जीवनाशी विलक्षण जुळतात –
"Though I may go to distant borders,
my soul will yearn for this, my home..."
हे गाणं ऐकताना त्याला आतून भरून येतं. कारण त्या ओळी त्याला त्याच्या मायदेशाच्या आठवणींत नेतात.