

Gautam Gambhir on Rohit Kohli Retirement
नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अखेर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत आपले मौन सोडले आहे. निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्याने म्हटले आहे आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
२० जूनपासून लीड्समध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी बोलताना, गंभीरने भारताच्या दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या पोकळीवर भाष्य केले. "खेळ कधी सुरू करायचा आणि कधी संपवायचा हा पूर्णत: वैयक्तिक निर्णय असतो,” असे गंभीरने एका मुलाखतीत म्हटले आहे. “कोणालाही निवृत्ती कधी घ्यावी हे सांगण्याचा अधिकार नाही - मग तो प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा या देशातील कोणीही असो. हा निर्णय अंत:करणातून घ्यावा लागतो.”
रोहित आणि कोहली दोघेही या महिन्याच्या सुरुवातीला कसोटीमधून दूर गेले, ज्यामुळे भारतीय क्रिकेटमधील एक दशकाहून अधिक पर्वाचा अध्याय संपला. गंभीरने मान्य केले की, रोहित आणि विराटच्या अनुभवाची निश्चितच उणीव भासेल, पण ही वेळ युवा खेळाडूंना संधी देणारी आहे, असेही तो म्हणाला. “हो, ते कठीण असेल, पण अनेक खेळाडू पुढे येतील. कोणीतरी बाहेर गेल्यावर दुसऱ्याला देशासाठी काहीतरी विशेष करण्याची संधी मिळते.” गंभीरने जसप्रीत बुमराहशिवाय भारताने जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देत सांगितले की, वरिष्ठ खेळाडू नसले तरी संघ यशस्वी होऊ शकतो.
दरम्यान, बीसीसीआय शनिवारी कसोटी संघ आणि भारताचा नवीन कसोटी कर्णधार जाहीर करण्याची शक्यता आहे, गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.