

Yuzvendra Chahal
दिल्ली : "अनेकदा वाटायचं, हे सगळं संपवून टाकावं... स्वतःलाच संपवण्याचा विचार मनात घोळत होता," असा धक्कादायक खुलासा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल याने पत्नी आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटावर केला आहे. त्या काळात आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो होतो आणि आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलो होतो, अशी कबुली त्याने पहिल्यांदाच दिली आहे.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. मात्र, काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि मार्च २०२५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. नात्यात तणाव असूनही, दोघांनीही सोशल मीडियावर आपण एक सामान्य जोडपे असल्याचाच आभास कायम ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची बातमी चाहत्यांसाठी मोठा धक्का होती.
राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने घटस्फोटाच्या काळातील आपल्या मानसिक स्थितीबद्दल पहिल्यांदाच मन मोकळे केले. तो म्हणाला, "आम्ही दोघेही आपापल्या करिअरमध्ये संघर्ष करत होतो. दोन महत्त्वाकांक्षी लोक एकत्र राहू शकतात, पण त्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते, जी आमच्या नात्यात हळूहळू कमी होत गेली."
खासगी आयुष्य जगासमोर येऊ नये म्हणून...
चहलने या मुलाखतीत सांगितले की, त्याने आणि धनश्रीने जाणीवपूर्वक आपल्या नात्यातील समस्या लोकांपासून लपवून ठेवल्या. आपले खासगी आयुष्य सार्वजनिक चर्चेचा विषय बनू नये, अशी त्यांची इच्छा होती. "जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण एक सामान्य जोडपे म्हणूनच लोकांसमोर जायचे, असे आम्ही ठरवले होते. मी कॅमेऱ्यासमोर प्रत्येक वेळी हसायचो, पण आतून पूर्णपणे तुटलो होतो," असे चहलने सांगितले.
आत्महत्येचे विचार मनात घोळत होते
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान चहलला तीव्र मानसिक तणावाचा सामना करावा लागला. त्याने सांगितले की, "जवळपास ४० दिवस मी दिवसातून फक्त २ तास झोपू शकत होतो. उर्वरित वेळ केवळ मानसिक संघर्षात जात होता. अनेकदा वाटायचे की या त्रासापेक्षा सर्व काही संपवून टाकलेले बरे. मी स्वतःला संपवण्याचा विचार करू लागलो होतो. पण माझ्या मित्रांनी मला त्या अंधारातून बाहेर काढले आणि सावरले."
'धोकेबाज'च्या आरोपांवरही सोडले मौन
घटस्फोटाच्या काळात चहलवर फसवणुकीसह अनेक प्रकारचे आरोप झाले. यावर बोलताना तो म्हणाला, "लोकांनी मला 'धोकेबाज' म्हटले, पण मी कधीच कोणाचे मन दुखावले नाही. मला दोन बहिणी आहेत आणि मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे. केवळ माझे नाव एखाद्या महिलेसोबत जोडले गेले, याचा अर्थ मी दोषी आहे, असा होत नाही."
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची ओळख एका व्हर्च्युअल डान्स क्लासमधून झाली होती. लॉकडाऊनच्या काळात चहल धनश्रीकडून डान्स शिकत होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली, पण काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि अखेर मार्च २०२५ मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले.