Khalid Jamil India football coach :
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करणाऱ्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाला नवी दिशा देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ईस्ट बंगाल आणि मोहन बागान यांसारख्या दिग्गज क्लबचे माजी व्यवस्थापक आणि सध्या जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक असलेल्या खालिद जामिल यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तब्बल १३ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाला एक भारतीय मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "AIFF कार्यकारी समितीने, तांत्रिक समितीच्या उपस्थितीत, खालिद जामिल यांची वरिष्ठ भारतीय पुरुष राष्ट्रीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे." जामिल यांची निवड भारताचे माजी प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांना मागे टाकत झाली आहे. जामिल हे तब्बल १३ वर्षांनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी साविओ मडेरा यांनी ऑक्टोबर २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. जामिल नेमके कधीपासून संघाची सूत्रे हाती घेतील, हे AIFF ने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
खालिद जामिल यांच्यावर संघाची धुरा सांभाळताच तात्काळ प्रभाव पाडण्याची मोठी जबाबदारी असेल. भारतीय संघाला सप्टेंबरमध्ये फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विंडोमध्ये खेळावे लागणार आहे. त्यानंतर ९ आणि १४ ऑक्टोबर रोजी सिंगापूरविरुद्ध एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीचे महत्त्वपूर्ण सामने खेळायचे आहेत. त्यामुळे जामिल यांच्या रणनीती आणि मार्गदर्शनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जन्म आणि कारकीर्द : खालिद जामिल यांचा जन्म २१ एप्रिल १९७७ रोजी कुवेतमध्ये झाला. त्यांचे आई-वडील भारतीय आहेत. भारताचे माजी मिडफिल्डर असलेले जामिल आता एएफसी प्रो लायसन्सधारक प्रशिक्षक आहेत. त्यांनी महिंद्रा युनायटेड, एअर इंडिया आणि मुंबई एफसी यांसारख्या क्लबसाठी व्यावसायिक फुटबॉल खेळले आहे. १९९८ ते २००६ या काळात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले. दुखापतीमुळे त्यांना लवकर निवृत्ती घ्यावी लागली, पण त्यानंतर त्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षकी कारकिर्दीत प्रवेश केला.
ऐतिहासिक कामगिरी : २०१६-१७ मध्ये आयझॉल एफसीला (Aizawl FC) ऐतिहासिक आय-लीगचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर जामिल राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीच्या झोतात आले. ईशान्य भारतातील क्लबने राष्ट्रीय लीग जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. या कामगिरीबद्दल त्यांना 'सय्यद अब्दुल रहीम सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयएसएलमधील पहिले भारतीय प्रशिक्षक : २०२१ मध्ये, नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने त्यांना मुख्य प्रशिक्षकपद देऊन इंडियन सुपर लीगमध्ये (ISL) इतिहास रचला. ते आयएसएल संघाचे पहिले भारतीय मुख्य प्रशिक्षक ठरले. सध्या ते जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सुपर कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.
प्रशिक्षण शैली : जामिल हे त्यांच्या शिस्तबद्ध बचावात्मक रणनीती, डावपेचांमधील लवचिकता आणि तरुण खेळाडूंमधील प्रतिभा ओळखण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय फुटबॉलमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.