

Yuvraj Singh On Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेटबाबत माध्यमांमध्ये सतत चर्चा होत असते. दरम्यान, अर्जुन सध्या युवराज सिंगकडून टिप्स घेत आहे. दरम्यान, अर्जुनने नुकत्याच एका मुलाखतीत सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय त्याला युवराज सिंग हा क्रिकेटपटू आवडतो असं सांगितलं होतं.
आता युवराज सिंगने अर्जुन तेंडुलकरबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. युवराज सिंगने अर्जुन तेंडुलकरचे कौतुक केलं आहे. त्याने आपल्या वडिलांच्या छायेतून बाहेर येत आपला मार्ग स्वतः चिकाटीनं तयार करत आहे असं युवराज म्हणाला. अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. तिथं सचिन तेंडुलकर मेंटॉर होता. मात्र यंदाच्या हंगामात अर्जुन लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे.
मुंबई इंडियन्समध्ये असताना अर्जुन तेंडुलकरला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळं त्याला आपल्या कामगिरीची छाप पाडता आली नाही. आता त्याला लखनौकडून किती संधी मिळते हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
दरम्यान, अर्जुनने युवराजला आपला आयडॉल संबोधलं होतं त्यावर आता युवराज सिंगने स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला की, 'ही खूप चांगली गोष्ट आहे कारण मी त्याच्या वडिलांकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. मेंटल बॅटल, फिजीकल बॅटल, टेक्निकल बॅटल अशा अनेक गोष्टी शिकलो आहे. मी आता त्या सर्व गोष्टी अर्जुनकडे पास करत आहे. तो माझ्याकडून शिकत आहे हे खूप ग्रेट आहे.'
युवराज पुढे म्हणाला, 'तो एक चांगला मुलगा आहे. तो खूप शार्प असून गोष्टी त्वरित आत्मसात कतो. मला देखील त्याच्याएवढी मेहनत करण्याची इच्छा आहे. त्याचे क्रिकेटवर प्रेम आहे. त्याचे वडील मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. अर्जुनची समर्पणाचा स्तर पाहून खूप भारी वाटतं.'
अर्जुन तेंडुलकरबाबत युवराजचे वडील योगराज सिंग यांनी देखील काही निरीक्षणे नोंदवली होती. मात्र युवराजने अर्जुन तेंडुलकरबाबत आपल्या वडिलांपेक्षा वेगळे मत व्यक्त केलं आहे. त्याबाबत बोलताना युवराज सिंग म्हणाला, 'अर्जुनने क्रिकेट सुरू केलं त्यावेळी तो एक चांगला गोलंदाज होता. तो अजूनही फलंदाजीतील काही गोष्टी शिकत आहे. तो त्याच्यावर काम करत आहे त्याच्यात नक्कीच सुधारणा होईल.'
युवराज पुढे म्हणाला, 'मला एका स्टेजला असं वाटतं की त्याला देखील अजून खात्री नाहीये की त्याची गोलंदाजी भक्कम आहे की फलंदाजी. पण मला अजूनही वाटतं की तो एक गोलंदाज आहे जो फलंदाजी करू शकतो. मी एक फलंदाज होतो जो गोलंदाजी करू शकत होता. मी त्याच्यासोबत काम करत राहिलो तर त्याची फलंदाजी नक्कीच सुधारेल.'