

Women's ODI World Cup 2025:
भारतीय महिला क्रिकेट संघानं महिला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील सेमी फायनलचं आपलं स्थान पक्कं केलं आहे. गुरूवारी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा डीएलएस नियमानुसार ५३ धावांनी पराभव केला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळं न्यूझीलंडला ४४ षटकात ३२५ धावांचे आव्हान मिळाले होते मात्र न्यूझीलंडला ८ बॅटर्सच्या मोबदल्यात २७१ धावाच करता आल्या.
महिला वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड हे संघ आधीच सेमी फायनलमध्ये पोहचले आहेत. दुसरीकडं न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांना सेमी फायनलमध्ये प्रवेश करणं जमलं नाही.
भारतीय संघानं वर्ल्डकपची धडाकेबाज सुरूवात केली होती. त्यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानवर विजय मिळवला होता. मात्र दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरूद्धच्या सलग तीन सामन्यात संघाला पराभवचं तोंड पहावं लागलं होतं. यामुळं टीम इंडियाच्या सेमी फायनल प्रवेशाच्या स्वप्नांना धक्का बसला होता.
न्यूझीलंडविरूद्धचा सामना हा करो या मरो स्थितीतला होता. या सामन्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखील खेळणाऱ्या टीम इंडियानं चांगली कामगिरी केली. आता भारताचा लीग स्टेजमधला शेवटचा सामना हा बांगलादेशसोबत २६ ऑक्टोबरला होणार आहे.
दरम्यान, भारताचा सेमी फायनलमध्ये कोणाशी सामना होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. भारत सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. जर भारतानं बांगलादेशविरूद्धचा सामना जिंकला तर भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या संघासोबत सेमी फायनल खेळायची आहे.
दुसरीकडं ११ गुण असलेली ऑस्ट्रेलिया आणि १० गुण असलेली दक्षिण अफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यावर भारत सेमी फायनलमध्ये कोणासोबत खेळणार हे ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना हा २५ ऑक्टोबरला होणार आहे. या दोघांमधील कोणता संघ प्रथम स्थानावर येईल तो सेमी फायनलमध्ये भारतासोबत खेळेल.