

BCCI On Sarfaraz Khan:
काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेटर सर्फराज खान बाबत नुकतेच एक ट्विट केलं होतं. यानंतर राजकीय तसंच क्रिकेट वर्तुळात एकच कल्लोळ माजला. शमा मोहम्मद यांनी गंभीरवर निशाणा साधत सर्फराज खानला त्याच्या आडनावामुळं संघात घेतलं नाही असा अप्रत्यक्ष आरोप केला. यानंतर भाजपचे नेते हा मुद्दा खोडून काढण्यासाठी मैदानात आले होते.
दरम्यान, आता बीसीसीआयमधील सूत्रांनी सर्फराज खान याला आगामी दक्षिण अफ्रिका अ संघाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय अ संघात का स्थान मिळालं नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय अ संघाचं नेतृत्व हे विकेटकिपर ऋषभ पंत याच्याकडं देण्यात आलं आहे. तो देखील संघात कमबॅक करत आहे. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त सरासरी असलेल्या सर्फराज खानला मात्र स्थान मिळालं नाही.
याबाबत बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पष्टीकरण दिलं असून सर्फराज खानला खराब कामगिरी किंवा पक्षपातीपणामुळं संघातून डावललं नसून त्याचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेस यामुळं त्याला संधी मिळालेली नाही.
बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं, 'सर्फराज खानच्या मांडीचा स्नायू दुखावला होता त्यामुळं त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. त्यानं रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. मात्र दीर्घ काळानंतर त्यानं फक्त काही सामनेच खेळले आहेत. निवडसमितीनं त्याचा यंदाच्या रणजी ट्रॉफीमधील फॉर्म पाहिला आहे. त्यानंतरच त्यांनी त्याला भारतीय अ संघात न घेण्याचा निर्णय घेतला.' सूत्र पुढे म्हणाले की आशा आहे की त्याला लवकरच पुनरागमनाची संधी मिळेल.
दरम्यान, पीटीआयच्या एका वृत्तात दावा केला आहे की ऋषभ पंतचे पुनरागमन हे सर्फराज खानला संघात न घेण्याचं कारण आहे. ऋषभ पंतला दुखापतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतायचं आहे. भारतीय अ संघातील फलंदाजीचा पाचवा क्रमांक पंतला देण्यात आला आहे. त्यामुळं संघात सर्फराज खानची जागाच होत नाही.
दरम्यान, सर्फराज खाननं तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो असं देखील सुचवलं होतं. यासाठी त्यानं रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईकडून तिसऱ्या क्रमांकावर देखील फलंदाजी केली होती. मात्र त्यानंतरही त्याला भारतीय अ संघात स्थान मिळालं नाही.