

Winter Olympics 2026
‘कंडोम’ हा शब्द उच्चारला की, काहींच्या गालावर खळी पडते, तर काहींच्या मनात ठराविक समजुती आणि संकोचाचे वादळ उठते; परंतु लाज-संकोच बाजूला ठेवून आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर सुरक्षिततेसाठी आणि जबाबदार वर्तनासाठी कंडोमचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळेच इटलीतील मिलानमध्ये सुरु असलेल्या विंटर ऑलिंपिकमध्ये कंडोचा तुटवडा हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मिलान कोर्टिना विंटर ऑलिंपिक सध्या सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी आयोजकांनी १०,००० कंडोम उपलब्ध करून दिले होते; पण खेळाडूंनी ते अपेक्षेपेक्षा खूपच लवकर वापरून संपवले आहेत. इटालियन वृत्तपत्र 'ला स्टॅम्पा'नुसार, विंटर (हिवाळी) ऑलिंपिक गावात मोफत दिलेले सर्व कंडोम आता संपले आहेत. खेळ सुरू होऊन काहीच दिवस झाले असताना इतक्या वेगाने कंडोम संपल्यामुळे सध्या सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे.
एका खेळाडूने 'ला स्टॅम्पा'शी बोलताना सांगितले की, कंडोमचा साठा फक्त तीन दिवसांत संपला. त्यांनी आम्हाला आणखी कंडोम येतील असे आश्वासन दिले होते, पण कुणास ठाऊक कधी येतील.”
या वर्षीच्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये ९२ देशांतील सुमारे २,९०० खेळाडू एकूण ११६ स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. या खेळांच्या इतिहासात यंदा महिला खेळाडूंचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ४७% आहे. 'फोर्ब्स'च्या रिपोर्टनुसार, सर्व २,९०० खेळाडूंनी सारख्याच प्रमाणात कंडोम वापरले असतील, तर प्रत्येक खेळाडूने ३ दिवसांत साधारण ७ कंडोम वापरले असावेत. इतक्या मोठ्या संख्येने आणि वेगाने वापर झाल्यामुळेच आयोजकांनी दिलेले कंडोम कमी पडले आणि त्यांचा तुटवडा निर्माण झाला. उर्वरित स्पर्धेसाठी ऑलिंपिक गावाला १०,००० किंवा त्याहून अधिक कंडोमची कमतरता भरून काढणे, हे एक कठीण आव्हान आहे.
ऑलिंपिक गावात १० हजार कंडोम संपल्याच्या वृत्ताची सोशल मीडियावर नेटिझन्सनी चांगलीच फिरकी घेतली. लोकांनी या परिस्थितीची तुलना कॉलेजच्या पहिल्या वर्षातील मुलांच्या हॉस्टेलशी केली आहे. एकाने विचारणा केली की, "हे हिवाळी ऑलिंपिक आहे की 'हिवाळी सेक्स ऑलिंपिक'?" "बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे कॅलरीज बर्न करण्यासाठी किंवा उब मिळवण्यासाठी खेळाडूंनी हा मार्ग निवडला असावा," असे एका युजरने म्हटले. काहींनी याला 'व्हॅलेंटाईन डे'चा परिणाम मानले. एका युजरने म्हटलं आहे की, "कंडोम बनवणाऱ्या कंपन्या नक्कीच आनंद साजरा करत असतील. त्यांना वाटत असेल की ऑलिंपिक दर चार वर्षांऐवजी दरवर्षीच व्हायला हवे!" अशी टिप्पणी एकाने केली.
काही नेटिझन्सनी याचे सकारात्मक पैलूही पाहिले आहेत. खेळाडू सुरक्षित संबंधांना प्राधान्य देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा जगभरातील लोक एका ठिकाणी जमतात, तेव्हा आरोग्याच्या दृष्टीने अशा गोष्टींचे वाटप करणे योग्यच आहे, असेही युजरने म्हटलं आहे.