

Blessing Muzarabani Zimbabwe Vs Australia: आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये एक मोठा अपसेट झाला आहे. झिम्बब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभव केला आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासमोर १६९ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर त्यांनी कांगारूंना १४६ धावात गुंडाळत सामना २३ धावांनी जिंकला. या विजयात झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी चमकला. त्यानं अवघ्या १७ धावात ४ विकेट्स घेतल्या. त्यानं कांगारूंची टॉप ऑर्डर उडवली.
मुजारबानी हा ६ फूट ८ इंचाचा उंचपुरा गोलंदाज आहे. त्याचा वेग आणि अचूक मारा करण्याची क्षमता यामुळे कांगारूंचे फलंदाज चांगलेच अडचणीत आले होते. या गोलंदाजीमुळंच झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरूद्ध विजय मिळवला.
मुजराबानी हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्यांना कांगारूंविरूद्ध ४ षटकात १७ धावात ४ विकेट्स घेतल्या. ही टी २० क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम फिगर आहे. याचबरोबर तो टी २० वर्ल्डकपमध्ये १०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये देखील सामील झाला आहे.
मुजारबानी आयपीएलमध्ये देखील दिसला आहे. गेल्या आयपीएल हंगामात मुजारबानी हा रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आला होता. तो लुंगी एन्गिडीची रिप्लेसमेंट म्हणून संघात आला होता. त्याला ७५ लाख रूपयात आरसीबीनं आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र त्याला त्या हंगामात प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
ब्लेसिंग मुजारबानी हा जगभरातील टी २० लीग खेळतो. फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये मुजारबानीने दमदार कामगिरी केली आहे. मुजारबानीने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण हे २०१७ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरूद्ध केलं होतं. त्यानं कसोटीतून हे आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.
ब्लेसिंगने आतापर्यंत झिम्बाब्वेकडून १८ कसोटी, ५७ वनडे आणि ८५ टी २० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ६७ विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये ७० विकेट्स घेतल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये मुजारबानीने दमदार कामगिरी करत २१.०८ च्या सरासरी आणि ७.१० च्या इकॉनॉमी रेटने १०० विकेट्स घेतल्या आहेत.