

Virat Kohli Instagram Account: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाउंट मंगळवारी रात्री अचानक डीअॅक्टिव्हेट झाल्याचे दिसून आले. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे नाव सर्च केल्यानंतर प्रोफाइल दिसत नसल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला तब्बल 27 कोटी 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब होणं ही बाब अनेकांना धक्का देणारी आहे. सोशल मीडियावर कोहलीचे चाहते स्क्रीनशॉट शेअर करत विविध तर्क-वितर्क लावत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, हे अकाउंट कोहलीने स्वतः बंद केलं आहे की इन्स्टाग्राममधील एखाद्या तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे, याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विराट कोहली, त्यांची टीम किंवा इन्स्टाग्राम प्रशासनाकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीचे भाऊ विकास कोहलीचे इन्स्टाग्राम अकाउंटही सर्चमध्ये दिसत नाही. त्यांच्या प्रोफाइलवर जाण्याचा प्रयत्न केल्यास ‘प्रोफाइल उपलब्ध नाही’ असा मेसेज दिसत असल्याचं अनेक युजर्स सांगत आहेत.
खरं तर, विराट कोहलीने यापूर्वीही सोशल मीडिया अकाउंट काही काळासाठी बंद केलं होतं. त्याने याआधी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक जाहिरातींच्या पोस्ट काढून टाकल्या होत्या. क्रिकेट आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करायचं असल्याचं त्याने या अगोदर सांगितलं होतं. मात्र, यावेळी अकाउंटच गायब झाल्यामुळे चाहत्यांचा गोंधळ वाढला आहे.