

Virat Kohli Return In Test:
नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेनं भारताला २ - ० असा व्हाईट वॉश दिला. यानंतर भारतीय संघावर अन् प्रशिक्षकांवर जोरदार टीका होत आहे. यानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला कसोटी क्रिकेट निवृत्तीतून बाहेर येऊन पुन्हा टीम इंडियाकडून कसोटी खेळण्यासाठी तयार करू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. विराट कोहलीने याच वर्षी १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
दरम्यन, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारताचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहली बाबत मोठं वक्तव्य दिलं आङे. सैकिया यांनी आज तक सोबत बोलताना हे वक्तव्य केलं. त्यांनी विराट कोहलीबाबत काही बोललं जात आहे. जे काही बोललं जात आहे ती फक्त अफवा आहे. कोहलीसोबत कसोटीत परतण्याबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही. अशा अफवांवर बोलत जाऊ नका, असं काही नाहीये.
दरम्यान, क्रिकबझच्या एका रिपोर्टमध्ये दावा केला गेला होता की बीसीसीआयमध्ये विराट कोहलीशी संपर्क करून त्याला कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेण्याची विनंती करता येईल असा विचार सुरू आहे. क्रिकबझच्या वृत्तात कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला एक खेळाडू आपल्या कसोटी क्रिकेटच्या भविष्याबाबत पुन्हा विचार करण्यात तयार होऊ शकतो असा देखील दावा केला होता.
विराट कोहली यांनी जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध किंग्सटन येथे आपली कसोटी कारकीर्द सुरू केली. त्यांच्या पहिल्या कसोटीत, त्यांनी पहिल्या डावात ४ धावा आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या. सुरुवातीच्या अपयशानंतर कोहलीने ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले, ती भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाची गाथा आहे. कोहली यांनी आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला.
खेळलेले सामने: १२३
केलेल्या धावा: ९२३०
फलंदाजीची सरासरी (Average): ४६.८५
शतके: ३०
अर्धशतके: ३१
द्विशतके : ७
कोहली यांची गणना आधुनिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह आणि दमदार फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांचे क्रिकेटप्रती असलेले समर्पण, फिटनेस आणि उत्कृष्ट फलंदाजी यामुळे चाहत्यांचे कसोटी क्रिकेटशी असलेले नाते अधिक घट्ट झाले. महान खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांनीही कोहलीमुळे तरुणांमध्ये कसोटी क्रिकेटबद्दल नवी आवड निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले होते.