

Virat Kohli Test Retirement Know All about his test records
नवी दिल्ली : भारताचा महान फलंदाज विराट कोहली याने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 36 वर्षीय कोहलीने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध जमैकामधील किंग्स्टन येथे पदार्पण केले होते आणि त्यानंतर त्याने भारतासाठी पांढऱ्या कपड्यांमध्ये एक गौरवशाली प्रवास पूर्ण केला.
विराटने 123 कसोटींमध्ये 9230 धावा केल्या असून त्याची सरासरी 46.85 इतकी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 30 शतके झळकावली आहेत. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवलेल्या विक्रमांविषयी जाणून घेऊया...
विराट हा सन 2012, 2015, 2016, 2018 आणि 2023 या वर्षांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे.
भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विराटने नाबाद 254 धावांची जबरदस्त खेळी केली होती. एका सामन्यात भारतीय कर्णधाराने नोंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करताना विराटने 20 शतके झळकावली आहेत. भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकाविण्याचा विक्रम त्याच्यावर आहे. यापुर्वी कोणत्याही भारताने कर्णधाराने इतकी शकते झळकावलेली नाहीत.
भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा
कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नेतृत्व करताना विराटने 5864 धावा केल्या आहेत. यामुळे तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे.
विराटने भारतासाठी सर्वाधिक 7 द्विशतके झळकावली आहेत.
कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके
कसोटी संघाचा कर्णधार म्हणून खेळताना त्याने 6 द्विशतके झळकावली आहेत. भारतीय कर्णधाराने केलेला हा एक विक्रमच आहे.
भारताचा सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा कर्णधार
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटीमध्ये 40 विजय मिळवले आहेत. यात त्याने कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले आहे.
कोहलीच्या नावावर हा अनोखा विक्रमही नोंद झाला आहे. त्याने सलग 4 चार मालिकांमध्ये सलग द्विशतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.
ICC कसोटी फलंदाज क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा भारतीय
आयसीसीच्या कसोटी फलंदाज क्रमवारीत 2018 मध्ये विराटने एकूण 934 गुण मिळवले होते. कोणत्याही भारतीय फलंदाजाने मिळवलेले हे सर्वाधिक रेटिंग आहे. यापुर्वी भारताच्या सचिन तेंडुलकरचे 887 हे हायस्ट रेटिंग होते.
सन 2018-19 साली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिला आशियाई कर्णधार ठरला होता. भारताचा हा ऐतिहासिक विजय होता.
कर्णधार म्हणून सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकल्या
विराटने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सलग सर्वाधिक 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाज
अनेक वर्षे क्रिकेटवर राज्य करणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध विराट कोहलीने 7 शतके झळकावली आहेत.
5000+ धावा आणि 50+ झेल
कसोटीत 5000 हून अधिक धावा आणि 50 हून अधिक झेल अशी कामगिरी विराटच्या नावावर नोंद आहे. त्याने 121 झेल घेतले आहेत. कोहली व्यतिरिक्त, गुंडप्पा विश्वनाथ, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनीही 5000+ धावा आणि 50+ झेल घेतले आहेत.
एका टेस्टमधील दोन्ही डावांत शतक
कसोटीच्या दोन्ही डावात शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. 2014 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड येथे कसोटीत पहिल्या डावात 115 आणि दुसऱ्या डावात 141 धावा केल्या होत्या. कोहलीशिवाय विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या भारतीयांनीही अशी कामगिरी केली आहे.
कसोटीच्या एका डावात शतक आणि दुसऱ्या डावात 90 च्या घरात बाद झालेल्या खेळाडूंपैकी विराट कोहली आहे. त्याच्यासोबत हे दोनदा घडले आहे.
2013 मध्ये, कोहलीने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 119 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात 96 वर तो बाद झाला होता.
तर 2018 मध्ये नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 97 धावांवर तो बाद झाला आणि दुसऱ्या डावात त्याने 103 धावा केल्या होत्या. कोहलीशिवाय या यादीत चंदू बोर्डे, मोहिंदर अमरनाथ, सौरव गांगुली, गौतम गंभीर आणि चेतेश्वर पुजारा या भारतायांचा समावेश आहे.
एकाच कसोटीत शतक आणि शून्य
कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक वेगळा रेकॉर्ड आहे. कसोटीच्या एका डावात शतक झळकावणाऱ्या, तर दुसऱ्या डावात खातेही उघडू न शकलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे.
2017 मध्ये ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात कोहलीला खाते उघडता आले नव्हते तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद 104 धावांची खेळी केली होती.