

Virat Kohli Test Retirement
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) आपल्या निर्णयाची माहितीही दिली होती. विराटने आज (दि. १२) साेशल मीडियावर पोस्ट करत आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले आहे. आपली कसोटी कारकीर्द अधोरेखित करताना त्याने एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. दरम्यान, राेहित शर्मा पाठाेपाठ विराट काेहलीही कसाेटी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने भारतीय संघाला अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवणार आहे.
विराट कोहली आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, भारतीय क्रिकेट कसोटी संघात पदार्पण केले त्याला १४ वर्ष पूर्ण झाली आहे. खरं सांगायचं तर, कसोटी क्रिकेटचा हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या प्रवासानं मला अनेक वेळा माझी कसोटीला घेतली, मला घडवलं आणि तसेच आयुष्यभर सोबत राहतील असे धडे दिले.
देशासाठी खेळणे ही एक वेगळीच व्यक्तिगत भावना असते. शांत चित्ताने मेहनत घेणे, सलग खेळाचे प्रदीर्घ दिवस आणि कधीच कोणाच्या नजरेस येत नाहीत असे कसाेटी खेळातील छोटे छोटे क्षण ; पण हेच क्षण कायमच मनात राहतात.आता या फॉरमॅटपासून दूर जाताना निर्णय सोपा नाही, पण योग्य वाटतोय. मी या खेळासाठी माझं सर्वस्व दिलं आणि त्यानं मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक दिलं, असेही विराटने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मी या प्रवासातून भरलेलं हृदय घेऊन जातोय. ज्या सहकाऱ्यांसाठी ज्यांच्यासोबत मी मैदानात उतरलो आणि प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ज्यांनी मला या वाटचालीत आपलं समजलं. माझ्या टेस्ट कारकिर्दीकडे मी नेहमीच हसत हसत मागे वळून पाहीन, असेही विराटने आपल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंचे भारतीय संघात मौलाचे योगदान होते. दोघांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा अनुभव नवख्या खेळाडूंना होत होता. विराट हा १०० हून अधिक कसोटी सामने खेळलेला अत्यंत अनुभवी खेळाडू होता. कसोटीमध्ये तो चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येत असे. आता या स्थानी कोणाला खेळवायचे? ही मोठी कसोटी बीसीसीआय समोर आहे.