

Virat Kohli Test retirement
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराटने आज (दि. १२) सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. विराटच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सिंहासारखा उत्साह असलेला माणूस. तुझी आठवण येईल cheeks," अशी पोस्ट गौतम गंभीर यांनी X वर केली आहे.
कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयनेही X वरील पोस्टमध्ये लिहिले, धन्यवाद, विराट कोहली! कसोटी क्रिकेटमधील एक युग संपले आहे. पण तुमचा वारसा कायम राहील. टीम इंडियासाठी त्याचे योगदान नेहमीच आठवणीत राहील.
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स यानेही X वर पोस्ट करत, 'प्रिय कोहलीला त्याच्या अद्भुत कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन! तुझा दृढनिश्चय आणि कौशल्य मला नेहमीच प्रेरणा देत राहिले. तू खरा महान खेळाडू आहेस!' असे म्हटले आहे.
तर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही, विराटला सर्वकालीन महान भारतीय क्रिकेटपटू असे म्हटले आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही विराटच्या निवृत्तीच्या निर्णयावर पोस्ट लिहिली आहे. 'आधुनिक क्रिकेट युगातील सर्वात मोठा ब्रँड, ज्याने क्रिकेटमधील सर्वात जुन्या फॉरमॅटसाठी आपले सर्वस्वी योगदान दिले. कसोटी क्रिकेट नेहमीच विराट कोहलीचे ऋणी राहील,' असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.
विराटने त्याच्या कारकिर्दीत भारतासाठी १२३ कसोटी सामने खेळले. या सामन्यांत त्याने ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३० शतके आणि ३१ अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २५४ धावा आहे.