

विराट कोहलीचा पुतण्या आर्यवीर कोहली आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग, यांचा दमदार खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. दिल्ली प्रीमियर लीगच्या (DPL) दुसऱ्या पर्वात हे खेळाडू मैदानात उतरतील. रविवारी झालेल्या DPL 2025 च्या लिलावादरम्यान या दोघांनाही वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांनी खरेदी केले. उदयोन्मुख लेग-स्पिनर असलेला आर्यवीर कोहली हा विराटचा मोठा भाऊ विकास याचा मुलगा आहे. त्याला साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने एक लाख रुपयांत खरेदी केले. याच संघात, लीगच्या सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या लेग-स्पिनर दिग्वेश राठी (38 लाख रुपये) याचाही समावेश आहे.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा या स्पर्धेचा सदिच्छादूत (Brand Ambassador) आहे. त्याच्या मुलगा आर्यवीर सेहवागला यंदा सेंट्रल दिल्ली किंग्स संघाने आठ लाख रुपयांना खरेदी केले आहे. या 19 वर्षीय फलंदाजाला मागील पर्वात कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. तो अनसोल्ड राहिला होता. स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त करताना विरेंद्र सेहवाग म्हणाला, ‘दिल्ली प्रीमियर लीगच्या (DPL) दुस-या पर्वाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. खेळाडूंसाठी एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी आहे.’
‘भारतातीलच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रेमींचेही लक्ष या लीगवर आहे. निवड समितीची या स्पर्धेवर नजर आहे. ही लीग खेळाडूंना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी देते. मागील वर्षी अविश्वसनीय क्रिकेटचा अनुभव आला. पण यंदाचे पर्व अधिकच रोमांचक ठरेल,’ असा विश्वास सेहवागने व्यक्त केला.
डीपीएलच्या लिलावासाठीच्या यादीत एकूण 520 खेळाडूंचा समावेश होता. त्यापैकी सिमरजीत सिंग (सेंट्रल दिल्ली किंग्स) 39 लाख रुपयांच्या बोलीसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त, नितीश राणा (34 लाख रुपये, वेस्ट दिल्ली लायन्स) आणि प्रिन्स यादव (33 लाख रुपये, न्यू दिल्ली टायगर्स) यांच्यासाठीही संघांना मोठी रक्कम मोजावी लागली.
या प्रसंगी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली म्हणाले, ‘यावर्षी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही आमच्या लिलाव प्रक्रियेत सुधारणा करून खेळाडूंची संख्या वाढवली आहे. सर्वोत्तम प्रतिभा समोर आणण्यासाठी आम्ही देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा उंचावला जाईल, याची खात्री केली आहे. या पर्वात आम्ही दोन नवीन पुरुष संघांच्या फ्रँचायझींचाही समावेश केला आहे. हे आमचे उच्च-स्तरीय स्पर्धात्मक क्रिकेटचे ध्येय पुढे नेईल,’ असे त्यांनी सांगितले.