

एजबॅस्टनच्या मैदानावर भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात आकाश दीपचा किती मोठा वाटा होता, हे सर्वांनीच पाहिले; पण या यशामागे दडलेली त्याची संघर्षगाथा फार कमी लोकांना माहिती आहे. एक वेळ अशी होती की, आकाशसाठी सर्व काही संपल्यात जमा होते. क्रिकेट कारकीर्द सुरू होण्याआधीच संपुष्टात येते की काय, असे अनेक प्रसंग त्याच्या आयुष्यात आले. मात्र, या कठीण काळात त्याने एका गोष्टीची साथ कधीच सोडली नाही आणि ती म्हणजे ‘आशा’. याच आशेच्या जोरावर आज तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षणी एक नवीन संघर्ष असतो आणि या संघर्षावर मात करून मिळवलेले यश अधिकच मौल्यवान ठरते. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याच्या आयुष्याकडे पाहिल्यास हे तंतोतंत लागू पडते. इंग्लंडमधील एजबॅस्टन कसोटीत आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडचा अहंकार धुळीस मिळवणारा हा नायक, त्याच वेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर पेलत होता. त्याने आपल्या वेदनांना कामगिरीतून वाट मोकळी करून दिली आणि विक्रमांची अशी काही नोंद केली की, त्याचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचे स्वप्न साकार करताना आकाश दीपला अनेक अग्निदिव्यातून जावे लागले. बिहारच्या सासाराममधून आलेल्या आकाशने क्रिकेटपटू बनण्याच्या दिशेने पावले टाकताच, बिहार क्रिकेट संघटनेवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे त्याला आपले राज्य सोडून दुसर्या राज्यात खेळावे लागले. 2019 मध्ये त्याने बंगालकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आकाशने एका मुलाखतीत सांगितले होते की, लहानपणी लोक त्याला टोमणे मारायचे. त्याच्या मित्रांचे कुटुंबीयही त्याच्याबद्दल वाईट बोलायचे. ते त्यांच्या मुलांना त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला द्यायचे. आकाशने सांगितले की, ‘लोक म्हणायचे की आकाशपासून दूर राहा. त्याच्या सहवासात राहून तुम्ही बिघडून जाल.’ असे असले तरी आज आकाश घडून गेलेल्या घटनांवरून कोणावरही टीका करत नाही. जेव्हा तो 23 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्याने काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला.
2015 हे आकाशच्या आयुष्यातील सर्वात कठीण वर्ष होते. त्याने काही महिन्यांच्या अंतराने त्याचे वडील आणि भाऊ दोघांनाही गमावले. त्याच्या वडिलांचे स्ट्रोकमुळे निधन झाले. दोन महिन्यांनंतर त्याचा भाऊही जग सोडून गेला. आकाश आर्थिक अडचणीत सापडला. त्याला त्याच्या आईची काळजी घ्यावी लागली. यामुळे त्याने तीन वर्षे क्रिकेट सोडले. नंतर आकाशला वाटले की तो जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. यानंतर तो दुर्गापूरला गेला. तिथून तो पुन्हा कोलकात्याला गेला. तो त्याच्या भावासोबत एका छोट्या खोलीत राहू लागला. बिहार क्रिकेट असोसिएशनवरील बंदीमुळे त्याच्यासाठी समस्या निर्माण झाल्या, ज्यामुळे त्याला बंगालला जावे लागले.
आकाश नेहमीच त्याच्या मित्राचे आभार मानतो. त्याने सांगितले की त्याच्या मित्राने त्याला वाईट काळात खूप मदत केली. त्याला दुर्गापूरमध्ये क्लब क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो टेनिस बॉल क्रिकेटमधून कमाई करायचा. काकांनी दुर्गापूरमध्येही खूप मदत केली. त्यांनी आकाशला अडचणींमधून बाहेर काढले आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित केले. आकाशने 2019 मध्ये बंगालसाठी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. त्याच वर्षी त्याला लिस्ट ए आणि टी-20 फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळाली.
कौटुंबिक आघातातून सावरत असतानाच, त्याला स्वतःला पाठीच्या दुखापतीने ग्रासले, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर गंभीर संकट ओढवले होते. परंतु, सर्व दुःख आणि वेदना सहन करत आकाश दीप आयुष्यात पुढे जात राहिला. त्याने हिंमत न हारता भारतीय संघाकडून खेळण्याच्या स्वप्नालाच आपले जीवन बनवले.
पदार्पणात घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर, आकाशने बांगलादेशमध्ये कहर केला. आता त्याने इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामना खेळला आणि आपला लौकिक पसरवला आहे. आकाशची कहाणी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. त्याने दाखवून दिले की तो कुटुंबासाठी काहीही करण्यास तयार आहे.
आज आकाश दीपचे टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले आहे; पण त्याच्या आयुष्यातील संकटांची मालिका अद्याप संपलेली नाही. नुकतेच त्याच्या मोठ्या बहिणीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. एजबॅस्टन कसोटी जिंकल्यानंतर आकाशने स्वतः ही माहिती दिली आणि आपली ही ऐतिहासिक कामगिरी कर्करोगाशी झुंज देणार्या बहिणीला समर्पित केली.
सामना संपला होता, विजयाचा आनंद शिगेला पोहोचला होता; पण आकाशच्या मनात वेगळंच वादळ घोंगावत होतं. सोनी स्पोर्टस्शी बोलताना त्याचा कंठ दाटून आला; पण त्याने अश्रूंना बांध घातला. तो म्हणाला, ‘माझी बहीण... ती कॅन्सरशी झुंज देत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मी आज जे काही केलं, ते फक्त तिच्यासाठी. खेळताना तिचाच चेहरा माझ्या डोळ्यांसमोर होता... हे यश तिला समर्पित करतो.’
बॅझबॉल शैलीचे गर्वहरण कसे केले? हे जाणून घेण्यासाठी त्याची आकडेवारी पुरेशी आहे. आकाशने एजबॅस्टन कसोटीत 187 धावांत 10 बळी घेतले. हे या मैदानावर कोणत्याही भारतीय गोलंदाजाचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. या कामगिरीसह त्याने चेतन शर्मा यांचा 1986 सालचा विक्रम मोडला. या कामगिरीमुळे त्याने केवळ संघातील आपले स्थानच पक्के केले नाही, तर मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या या दुहेरी लढाईत तो ज्या धैर्याने उभा आहे, ते पाहून संपूर्ण देश आज त्याला सलाम करत आहे.
आकाशने बंगालसाठी 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या काळात त्याने 138 विकेट्स घेतल्या आहेत. 28 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, त्याने 48 टी-20 सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळला आहे. या वर्षी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये 10 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश खालच्या फळीत फलंदाजी देखील करतो आणि मोठे शॉट्स मारण्यातही तो पारंगत आहे.