

Bengaluru stampede : तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाचा परमोच्च आनंद अल्पजीवी ठरला. आरसीबी संघाचा अचानक ठरवण्यात आलेला विजयोत्सव याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी बुधवारी (दि.३ जून) हजारो चाहत्यांनी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या दुर्घटनेसंदर्भात पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर आरसीबी टीमच्या अधिकृत निवेदनासह स्वतःचा एक भावनिक संदेशही शेअर केला."शब्दच सापडत नाहीत... अंत:करणातून व्यथित आहे, " असे त्याने म्हटले आहे.
आरसीबीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच आमचा कार्यक्रम तात्काळ थांबवण्यात आला. स्थानिक प्रशासनाच्या आम्हाला दिलेल्या सूचनांनुसार आम्ही पुढील निर्णय घेतला. या दुःखद घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आम्हाला तीव्र दु:ख झाले आहे. आमच्या संवेदना पीडित कुटुंबांप्रती आहेत.
आरसीबी संघाचा विधानभवनासमोर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे सुमारे एक लाख चाहत्यांनी स्टेडियमकडे धाव घेतली. हजारो चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 युवक आणि4 युवतींचा समावेश आहे. ५० जण जखमी झाले असून यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर बौरिंग आणि वैदेही या दोन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुर्घटनेबद्दल जनतेची माफी मागितली आहे.