

Virat Kohli Vijay Hazare Trophy
नवी दिल्ली : जयपूरमध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात गुजरातला दिल्लीकडून निसटता पराभव पत्करावा लागला. २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सलामीवीरांच्या दमदार सुरुवातीनंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केल्यामुळे गुजरातचा संघ २४७ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात गुजरात संघाचा फिरकीपटू विशाल जयस्वालने दिल्लीचे अनुभवी खेळाडू विराट कोहली, ऋषभ पंत आणि नितीश राणा यांच्या विकेट्स घेऊन क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले.
दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामन्यात विराट कोहली ७७ धावांवर खेळत असताना विशाल जयस्वालने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले. दिल्लीचा संघ हा सामना ७ धावांनी जिंकला असला, तरी सामन्याची सर्व चर्चा मात्र विशाल जयस्वालच्या त्या एका विकेटभोवती फिरत होती. विशालने विराटची महत्त्वाची विकेट घेतली. या अविस्मरणीय कामगिरीनंतर विराटने केवळ त्याचे कौतुकच केले नाही, तर त्याला भविष्यासाठी मोलाचा सल्लाही दिला.
सामना संपल्यावर गुजरातचे इतर खेळाडू ड्रेसिंग रूमकडे परतले, पण जयस्वाल तिथेच थांबला. त्याने पंचांकडे त्या 'मॅच बॉल'ची मागणी केली, ज्या चेंडूवर त्याने कोहलीला बाद केले होते. हातात तो चेंडू घेऊन तो दिल्लीच्या ड्रेसिंग रूमकडे गेला. तिथे विराटला पाहताच तो थोडा थबकला. पण विराटनेच त्याला हसून आत बोलावले. घाबरलेल्या विशालने खिशातून चेंडू काढला आणि म्हणाला, "भैय्या, या बॉलवर तुमची ऑटोग्राफ हवी आहे." कोहलीने आपले किट बाजूला ठेवले, त्याला जवळ बसवून घेतले आणि संवाद साधला. विराट विशालला म्हणाला, "तू चेंडू खूप छान टाकतोस. अशीच मेहनत करत राहा. संधी नक्की मिळेल, फक्त थोडी वाट बघ आणि सराव सोडू नकोस." एका महान खेळाडूने दिलेली ही थाप विशालसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी होती.
अक्षर पटेलप्रमाणेच जयस्वाल सुद्धा गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियादचा आहे. त्याने त्याच अकादमीतून क्रिकेटचे धडे गिरवले जिथून भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधाराने सुरुवात केली होती. जयस्वाल अवघ्या आठ महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. मोठे होत असताना क्रिकेट त्याची आवड बनली आणि त्याने आपल्या आईला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न सांगितले. हा प्रवास सोपा नव्हता, पण त्याच्या आईने त्याला खंबीर पाठिंबा दिला.
२०२२-२३ च्या सी.के. नायडू करंडकात सर्वाधिक विकेट्स घेणारा जयस्वाल म्हणाला, "हा प्रवास अत्यंत कठीण होता, पण आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळेच आहे. तिला पुरस्कार सोहळ्यात घेऊन जाणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण होता."
जयस्वालच्या मते, अक्षर पटेलने त्याच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो म्हणाला, "अक्षर भाईने मला क्रिकेट किटपासून ते जर्सी आणि बॅट्सपर्यंत खूप मदत केली आहे. ते माझे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आहेत. मला नेहमीच त्यांच्यासारखा अष्टपैलू खेळाडू बनायचे आहे. खेळ कधी बदलायचा, धावगतीवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि मानसिकदृष्ट्या खंबीर कसे राहायचे, हे ते मला शिकवतात."