पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat Resigns) रेल्वेतील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. आता ती राजकीय आखाड्यात उतरून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. आज ती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
आपण रेल्वेची सदैव ऋणी राहीन, असे तिने राजीनामा पत्रात म्हटले आहे. भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे . भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन.
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काही वेळात काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. नुकतीच दोन्ही कुस्तीपटूंनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर दोघांच्याही राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. या बैठकीनंतर विनेश जुलाना आणि बजरंग पुनिया हे बदली मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. किंवा दोनपैकी एक पैलवान निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो.
राहुल यांची भेट घेतल्यानंतर बजरंग आणि विनेश यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. पॅरिसहून परतल्यानंतर विनेश फोगट दिल्ली विमानतळावर पोहोचली तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा आले होते. विनेशच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दीपेंद्रही लांबवर चालला होता. त्यावेळी बजरंग पुनियाही त्याच्यासोबत होता. तेव्हापासून विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. त्यानंतर दोन्ही कुस्तीपटूंनी दिल्लीत भूपेंद्र सिंह हुड्डा यांचीही भेट घेतली.