

नवी मुंबई : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता आयपीएल २०२६ पूर्वी एका मोठ्या स्पर्धेत धमाका करण्यास सज्ज झाला आहे. १६ संघांचा सहभाग असलेल्या प्रतिष्ठित 'डी.वाय. पाटील टी-२०' स्पर्धेत वैभव खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १७५ धावांची झंझावाती खेळी करून वैभवने 'सामनावीर' किताब पटकावला होता. संपूर्ण स्पर्धेत ४९६ धावांसह तो अव्वल स्थानी राहिला.
तत्पूर्वी, आपल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे २०२५ मध्ये वैभव हा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केला जाणारा क्रिकेटपटू ठरला होता. अवघ्या १४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्यापूर्वीच इतकी लोकप्रियता मिळवणारा तो गेल्या दशकातील एकमेव खेळाडू ठरला आहे.
'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, वैभव सूर्यवंशी २३ फेब्रुवारीपासून नवी मुंबईत सुरू होणाऱ्या डी.वाय. पाटील स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. या स्पर्धेत डी.वाय. पाटील अकादमीचे दोन संघ सहभागी होतात, ज्यापैकी एका संघातून वैभव मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. सध्या तो तळेगाव येथे राजस्थान रॉयल्सच्या सराव शिबिरात आयपीएल २०२६ ची तयारी करत आहे.
आयोजकांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "वैभवला कोणत्या संघात स्थान द्यायचे यावर सध्या चर्चा सुरू आहे. आयपीएलपूर्वी तो या स्पर्धेत खेळताना दिसण्याची दाट शक्यता असून, नवी मुंबईतील या व्यासपीठावर दरवर्षी अनेक दिग्गज खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळते."
डी.वाय. पाटील टी-२० स्पर्धा ही देशातील सर्वात जुन्या आणि मानाच्या स्पर्धांपैकी एक आहे. २००३ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. भारतीय संघातील जे खेळाडू सध्या टी-२० विश्वचषकाच्या ताफ्यात नाहीत, ते देखील आयपीएलच्या पूर्वतयारीसाठी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अशा अनुभवी खेळाडूंसमोर स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आता वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे.