

मुंबई : भारतीय क्रिकेटचा उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने क्रिकेट कारकिर्दीला प्राधान्य देत २०२६ ची १० वीची बोर्ड परीक्षा न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आगामी 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL 2026) मधील सहभागासाठी त्याने सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षेवर पाणी सोडले असल्याचे समोर आले आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल आणि १९ वर्षांखालील (U-19) स्तरावर आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवत क्रिकेट विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच भारताला 'अंडर-१९ विश्वचषक' जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती; विशेषतः अंतिम सामन्यात त्याने खेळलेली 175 धावांची खेळी निर्णायक ठरली. विश्वचषक विजयानंतर वैभव यंदा १० वीची परीक्षा देणार असल्याची चर्चा होती, त्याचे प्रवेशपत्र देखील आले होते. मात्र, आयपीएलच्या पूर्वतयारी शिबिरात व्यस्त असल्याने तो परीक्षेला बसू शकणार नाही.
सीबीएसई १० वीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. दुसरीकडे, २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 'डी. वाय. पाटील टी-२०' स्पर्धेत वैभव खेळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. वैभव ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचे संचालक आदर्श कुमार पिंटू यांनी या संदर्भात वैभवच्या वडिलांशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले.
'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, वैभवचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी तो यंदा बोर्डाची परीक्षा देणार नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ओझा म्हणाले, ‘वैभव सध्या नागपूरमध्ये असून आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. तो राजस्थान रॉयल्सच्या प्री-सीझन कॅम्पमध्ये सामील झाला आहे.’ आयपीएल २०२६ मध्ये वैभव राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचा महत्त्वाचा दुवा असणार आहे. २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी त्याने आतापासूनच कंबर कसली आहे.
मॉडेस्टी स्कूलचे संचालक आदर्श कुमार पिंटू यांनी माहिती दिली की, वैभवचा परीक्षा फॉर्म भरला गेला असून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्रही आले आहे. मात्र, वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, ‘सध्या वैभवचे संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित आहे. तो प्रशिक्षणात व्यस्त आहे, त्यामुळे तो १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेस बसणार नाही. मात्र, पुढील वर्षी तो १० वीची परीक्षा नक्की देईल,’ असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.