

Usman Khawaja Retirement: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घोषित केला. त्याने इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या अॅशेस कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातला पहिला मुस्लीम कसोटी क्रिकेटपटू होता. त्यानं त्याच्या १५ वर्षाच्या कारकीर्दित वंशभेदाची पारंपरिक चौकट मोडून काढली होती.
जर उस्मान ख्वाजाची अॅशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग ११ मध्ये निवड झाली तर तो ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा फलंदाजीसाठी उतरणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे त्याच्यासाठी खास ग्राऊंड ठरण्याची शक्यता आहे.
उस्मान ख्वाजाने आपल्या कारकिर्दीत ८८ कसोटी सामने खेळले असून त्याने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच २०११ मध्ये इंग्लंडविरूद्ध पदार्पण केलं होतं. आता तो त्याच इंग्लंडविरूद्ध आपला कसोटी क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळणार आहे.
निवृत्ती जाहीर करताना उस्मान ख्वाजानं एक भावनिक वक्तव्य केलं. तो म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाकडून खूप सारे सामने खेळायला मिळाले याबद्दल मी स्वतःला लकी समजतो.' तो पुढे म्हणाला की, पाकिस्तानातून आलेल्या ज्या एका कृष्णवर्णीय मुस्लीम मुलाला तू कधीही ऑस्ट्रेलियाकडून खेळू शकणार नाहीस असं सांगितलं गेलं होतं त्या मुलाचा मला खूप अभिमान आहे. आता माझ्याकडे पहा आणि तुम्ही देखील असं करू शकता.'
उस्मान ख्वाजा हा लहानपणी इस्लामाबादमधून ऑस्ट्रेलियात आला होता. त्यानंतर तो सर्व अडचणींवर मात करत ऑस्ट्रेलियाचा पहिला ऑस्ट्रेलियान-पाकिस्तानी खेळाडू ठरला होता. तसेच तो ऑस्ट्रेलियाचा पहिला मुस्लीम क्रिकेटपटू देखील ठरला.
कधी काळी तो ऑस्ट्रेलियात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा एकमेव आशियाई व्यक्ती होती. त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया संघात आशियाई क्रिकेटपटूंसाठी दारं उघडणारा खेळाडू म्हणून पाहिलं जातं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख टॉड ग्रीनबर्ग यांनी सांगितलं की, 'उस्मान ख्वाजानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्याने १५ वर्षापूर्वी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्याच्या कामगिरीने, स्टायलिश फलंदाजीनं आणि उस्मान ख्वाजा फाऊंडेशन द्वारे देखील ऑस्ट्रेलियासाठी मोठं योगदान दिलं आहे.'