

ॲडलेड : कसोटी क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'ॲशेस' मालिकेत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ॲडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अजेय आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने सलग पाचव्यांदा ॲशेस चषक आपल्याकडेच राखला आहे.
ॲडिलेड कसोटीवर पूर्णपणे यजमान ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. पहिल्या डावात यष्टिरक्षक एलेक्स कॅरीच्या १०६ धावा आणि उस्मान ख्वाजाच्या ८२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव २८६ धावांवर आटोपला.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ८५ धावांच्या आघाडीसह फलंदाजी करताना ट्रेव्हिस हेडच्या झंझावाती १७० धावा आणि पुन्हा एकदा ॲलेक्स कॅरीच्या ७२ धावांच्या जोरावर ३४९ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडसमोर विजयासाठी ४३५ धावांचे विशाल लक्ष्य होते. विल जॅक्स आणि जेमी स्मिथ यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण इंग्लंडचा डाव ३५२ धावांवर आटोपला. कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी ३ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दशकाभराचा दुष्काळ : इंग्लंडला २०१५ पासून एकदाही ॲशेज मालिका जिंकता आलेली नाही. तब्बल १० वर्षांपासून इंग्लंड या चषकासाठी आसुसलेला आहे.
विक्रमी कामगिरी : ही ७४ वी ॲशेज मालिका आहे, ज्यापैकी ३५ व्यांदा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडने ३२ वेळा बाजी मारली आहे.
२००० नंतरचा दबदबा : गेल्या २४ वर्षांत झालेल्या १४ ॲशेज मालिकांपैकी ९ वेळा ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले आहे.
२०१७-१८ : ऑस्ट्रेलिया : ४-० ने विजयी
२०१९ : मालिका ड्रॉ : ऑस्ट्रेलियाकडे चषक कायम
२०२१-२२ : ऑस्ट्रेलिया : ४-० ने विजयी
२०२३ : मालिका ड्रॉ : ऑस्ट्रेलियाकडे चषक कायम
२०२५-२६ ऑस्ट्रेलिया : ३-० ने पुढे (अद्याप २ सामने बाकी)
पर्थ, ब्रिसबेन आणि आता ॲडिलेडमध्ये सलग तीन पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. मालिका हातातून गेली असली तरी, उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवून सन्मान राखण्याचे आव्हान बेन स्टोक्सच्या संघासमोर असेल. मालिकेतील चौथा सामना 'बॉक्सिंग डे' कसोटी म्हणून २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाईल.