

Under 19 Asia Cup 2026 : अंडर-19 आशिया कप २०२६ मधील साखळी सामने संपले असून, स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील (सेमीफायनल) चारही संघ निश्चित झाले आहेत. ग्रुप 'अ'मधून पाकिस्तान आणि भारताने आगेकूच केली आहे, तर ग्रुप 'ब'मधून अफगाणिस्तान आणि बांगलादेशने बाजी मारली आहे.
मंगळवारी झालेल्या अखेरच्या ग्रुप सामन्यांमध्ये भारताने संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७० धावांनी पराभव करत दिमाखात सेमीफायनलचे तिकीट मिळवले, तर पाकिस्तानने नेपाळचा १०१ धावांनी धुव्वा उडवत ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले. आता १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानची गाठ बांगलादेशशी पडेल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताची भिंत अफगाणिस्तानविरुद्ध असेल. या स्पर्धेचा महाअंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.
साखळी फेरीतील (ग्रुप स्टेज) समीकरणे पाहता, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आपापले उपांत्य सामने जिंकून १४ नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचे लक्ष या महामुकाबल्यावर लागले आहे.
सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी भारताला यूएईविरुद्धचा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून युवा फलंदाज आर्यवीर सहवाग याने विक्रमी खेळी करताना १६८ चेंडूत १७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने तब्बल १६० धावांची शानदार शतकी खेळी केली.प्रत्युत्तरात, ३१० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा डाव भारतीय गोलंदाजीसमोर २३९ धावांवर आटोपला. भारताकडून यूएईचा हा डाव रोखण्यात प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. या विजयासह भारताने ग्रुप 'अ'मध्ये ४ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले.
दुसऱ्या एका सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा १०१ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने ५० षटकांत ७ बाद २७५ धावा केल्या. अहमद हुसेनने ७३ चेंडूत ८९ धावांची तर कर्णधार फरहान युसूफने ७४ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ ४३.४ षटकांत १७४ धावांवर ऑलआऊट झाला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अहमद हुसेनला 'प्लेयर ऑफ द मैच' घोषित करण्यात आले.ग्रुप 'ब'मध्ये अफगाणिस्तानने अप्रतिम कामगिरी करत आपले तिन्ही सामने जिंकून ६ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. बांगलादेशने दोन विजय मिळवत चार गुणांसह दुसरे स्थान राखून सेमीफायनल गाठली, तर श्रीलंका आणि मलेशियाचे आव्हान संपुष्टात आले.
पहिला सेमीफायनल (१२ नोव्हेंबर): पाकिस्तान वि. बांगलादेश
दुसरा सेमीफायनल (१२ नोव्हेंबर): भारत वि. अफगाणिस्तान
अंतिम सामना (फायनल): १४ नोव्हेंबर २०२६