

उडिने-इटली : युरोपियन फुटबॉलच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या युएफा सुपर कपच्या अंतिम सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने टॉटनहॅम हॉटस्परवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 ने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सामन्यात दोन गोलांची भक्कम आघाडी मिळवूनही टॉटनहॅमला पराभवाचा धक्का बसला. अखेरच्या काही मिनिटांत ‘पीएसजी’ने केलेल्या अविश्वसनीय पुनरागमनामुळे हा सामना फुटबॉलप्रेमींच्या कायम स्मरणात राहील.
सामन्याच्या 39 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर मिकी व्हॅन डी वेनने गोल करत टॉटनहॅमचे खाते उघडले. मध्यंतरानंतरही स्पर्सने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. पेड्रो पोरोच्या पासवर ख्रिस्तियन रोमेरोने हेडरद्वारे गोल करून संघाला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. यानंतर सामना पूर्णपणे टॉटनहॅमच्या नियंत्रणात असल्याचे दिसत होते. मात्र, सामन्याच्या 84 व्या मिनिटाला ‘पीएसजी’च्या कांग-इन लीने बॉक्सच्या बाहेरून एक शानदार गोल करत सामन्यात जान आणली. या गोलने ‘पीएसजी’च्या खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास संचारला.
त्यानंतर सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये ओस्मान डेम्बेलेच्या क्रॉसवर गोन्सालो रामोसने हेडरद्वारे गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला आणि टॉटनहॅमच्या गोटात शांतता पसरली.
अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये ‘पीएसजी’ने बाजी मारली. टॉटनहॅमकडून मिकी व्हॅन डी वेन आणि मॅथिस टेल यांनी पेनल्टी चुकवली, तर ‘पीएसजी’कडून नुनो मेंडेसने विजयी गोल करत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सामन्यानंतर टॉटनहॅमच्या प्रशिक्षकांनी सांगितले, आम्ही 80 मिनिटे सामना नियंत्रणात ठेवला होता; पण एका गोलने चित्र पालटले. तरीही मला संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे.