

दिल्ली : भारताला २०२५ चा आशिया चषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा युवा क्रिकेटपटू तिलक वर्मा याने आपल्या आयुष्यातील एका गंभीर आरोग्य संकटाबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे. २०२२ मध्ये त्याला 'र्हाबडोमायोलिसिस' (Rhabdomyolysis) नावाच्या दुर्मीळ स्नायू विकाराचे निदान झाले होते. या धोकादायक स्थितीमुळे त्याचा जीवही धोक्यात आला होता, असे वर्माने सांगितले.
'ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात बोलताना तिलक वर्माने ही माहिती दिली. "मी याबद्दल कधीही कोणाशी बोललो नव्हतो. माझ्या पहिल्या आयपीएल हंगामानंतर मला काही आरोग्याच्या समस्या जाणवल्या. मला फिट राहायचे होते, पण मला 'र्हाबडोमायोलिसिस'चे निदान झाले, ज्यामुळे स्नायू वेगाने तुटतात," असे त्याने सांगितले.
'जिम आणि रिकव्हरीकडे दुर्लक्ष'
तिलकने सांगितले की, तो कसोटी संघात स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत होता. त्यासाठी तो अनेकदा अति-व्यायाम करायचा आणि शरीराला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ देत नसे. "विश्रांतीच्या दिवशीही मी जिममध्ये असायचो. मला सर्वात तंदुरुस्त खेळाडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व्हायचे होते. मी आइस बाथ घेत होतो, पण योग्य रिकव्हरीकडे दुर्लक्ष करत होतो. यामुळे माझ्या स्नायूंवर प्रमाणापेक्षा जास्त ताण आला आणि ते तुटायला लागले. माझ्या नसा खूप कडक झाल्या होत्या," असे त्याने सांगितले.
बांगलादेशमधील सांगितला भयानक प्रसंग
बांगलादेशमध्ये 'A' मालिका खेळतानाचा एक प्रसंग सांगताना तिलक म्हणाला, "मी शतक पूर्ण करण्यासाठी स्वतःला खूप प्रेरित केले, पण अचानक माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले आणि माझ्या बोटांनी काम करणे थांबवले. सगळं काही दगडासारखं कडक झालं होतं. मला 'रिटायर हर्ट' होऊन मैदान सोडावे लागले आणि बोटे हलत नसल्यामुळे माझे ग्लोव्ह्ज कापून काढावे लागले."
काही तासांचा विलंबही जीवघेणा ठरला असता
या गंभीर परिस्थितीत मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आणि मालक आकाश अंबानी यांच्यामुळेच आपल्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली, असे तिलक वर्माने सांगितले. "आकाश भाई (आकाश अंबानी) यांनी तात्काळ बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी संपर्क साधला. मुंबई इंडियन्स आणि जय शहा यांचे मी आभार मानतो. मला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, आणखी काही तासांचा विलंबही माझ्यासाठी जीवघेणा ठरू शकला असता. माझी प्रकृती इतकी गंभीर होती की सलाईनची सुई टोचताना ती तुटत होती," असे त्याने सांगितले.
तिलक वर्मा गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग असून, याच संघातील चमकदार कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात त्याने मॅच-विनिंग खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.