

लंडन : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ओव्हल क्रिकेट मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३६७ धावांवर सर्वबाद झाला. ओव्हल कसोटीतील या अविस्मरणीय विजयानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या संघाचे कौतुक केले आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर गौतम गंभीर यांनी आपल्या संघाचे कौतुक करत लिहिले, “आम्ही काही सामने जिंकू, काही हरू. पण आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही. शाब्बास मुलांनो!” गंभीर यांची ही पोस्ट X वर जबरदस्त व्हायरल झाली आहे. गंभीर यांची संपूर्ण मालिकेदरम्यान एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची रणनीती वादात सापडली होती. अनेक तज्ज्ञांनी त्यावर टीका केली, पण गंभीर ठाम राहिले. कर्णधार शुभमन गिलने ओव्हल कसोटीतील विजयानंतर आपल्या प्रशिक्षकाचे उघडपणे समर्थन केले.
शुभमन गिलने सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले, "या मालिकेपूर्वी गौती भाई (गौतम गंभीर) म्हणाले होते की, आपण एक तरुण संघ आहोत, पण आपण स्वतःला तरुण संघ म्हणून नाही, तर एक शक्तिशाली संघ म्हणून पाहिले पाहिजे. आज आम्ही दाखवून दिले की आम्ही खरोखरच एक शक्तिशाली संघ आहोत, ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे."
३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची धावसंख्या एकेकाळी ३ बाद ३०१ अशी होती. त्यावेळी हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्यात १९५ धावांची भागीदारी झाली होती. सामना पूर्णपणे इंग्लंडच्या ताब्यात आहे असे वाटत होते. पण त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने इंग्लिश संघाचा कणाच मोडला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पाच तर प्रसिद्ध कृष्णाने चार बळी घेतले. या सामन्यात भारताने आपल्या पहिल्या डावात केवळ २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडची सलामीची जोडी बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या डावात इंग्लंडची धावसंख्या एकेकाळी १ बाद १०९ अशी होती, पण त्यानंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडला केवळ २४७ धावाच करता आल्या. म्हणजेच, पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला फक्त २३ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार ११८ धावांची खेळी केली. तर नाईटवॉचमन आकाश दीप (६६ धावा), रवींद्र जडेजा (५३ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (५३ धावा) यांनीही अर्धशतकी खेळ्या साकारल्या, ज्यामुळे भारताची धावसंख्या ३९६ पर्यंत पोहोचली.