

निमिष पाटगावकर
काही आनंदाचे क्षण हे मनाच्या कुपीत बंद करून ठेवायचे असतात आणि पुन्हा पुन्हा हळूच आठवून त्या आनंदाच्या लहरींनी रोमांचित व्हायचे असते. ओव्हलला भारतीय संघाने अशा क्षणांच्या लायब्ररीत भर टाकली. ‘तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी’ हे फक्त जगाची निर्मिती करणार्या विठ्ठलाला वेडा कुंभार म्हणण्यापुरते मर्यादित नाही तर भारताला जिंकवून देण्याचे वेड मनाशी बाळगून मैदानात उतरलेल्या मोहम्मद सिराजलाही लागू आहे. क्राऊलीचा बळी घेऊन विजयचा पाया घडवणार्या सिराजनेच ब्रूकचा झेल टाकून विजयाच्या इमारतीचे बांधकाम तोडून टाकले. आपल्या हातून ही चूक झालेली भारताला सामना गमवायला कारणीभूत होत आहे हे मनात रुतून बसल्यावर पाचव्या दिवशी सिराजचे वेगळेच रूप दिसले. इंग्लिश फलंदाजांना धावांचा खुराक बंद करून त्याने जे ताडन केले त्याने भारताला हा अशक्यप्राय विजय मिळाला. प्रसिद्ध कृष्णाची मोलाची साथ त्याला मिळाली. रहस्यपटाची उकल व्हायलाही दोन-अडीच तासांचा चित्रपट बनवावा लागतो, पण केवळ 56 मिनिटांचा इतका सुंदर रहस्यपट कदाचित दुसरा बनणार नाही.
हा सामना चौथ्या दिवशीच चालू राहिला असता तर कदाचित आपल्याला विजय मिळाला असता, पण सामना पाचव्या दिवशी गेल्याने इंग्लंडला सकाळी जड रोलर फिरवायची संधी मिळणार होती. जे खेळपट्टीचे उंचवटे भारताच्या मदतीला चौथ्या दिवशी तिसर्या सत्रात आले ते सर्व या जड रोलरखाली दाबून जाणार होते आणि त्याचबरोबर भारताच्या विजयाच्या आशाही. भारताच्या द़ृष्टीने सकारात्मक बाब होती ती म्हणजे पाचव्या दिवशी सकाळी वातावरण हे चौथ्या दिवसाच्या संध्याकाळ सारखेच ढगाळ होते. हा जुना चेंडू चांगला स्विंग होत असल्याने भारत नवा चेंडू उपलब्ध असतानाही घेणार नव्हते हे दिसत होते. दिवसाच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार बसल्याने इंग्लंडला विजयासाठी हव्या असलेल्या धावा पस्तीसवरून थेट 27 वर आल्याने सोमवार असूनही प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या ओव्हलमधील प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या भारतीय चाहत्यांचा आणि टीव्हीला डोळे लावून बसलेल्या करोडो भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. जेमी स्मिथसारखा तडाखेबाज फलंदाज त्याला साथ द्यायला बर्यापैकी फलंदाजी करू शकणारा ओव्हरटन मैदानात असता भारतीय चाहत्यांना पराभव दिसायला लागला होता, पण मैदानावरच्या 11 भारतीय शिलेदारांनी धीर सोडला नव्हता.
जेमी स्मिथ त्याच्या नैसर्गिक खेळीनुसार खेळला असता तर कदाचित त्याला सोपे गेले असते, पण आक्रमण का बचाव या द्विधा अवस्थेत तो अडकला. ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या दोन चेंडूंना तो थोडक्यात बचावला तेव्हा पुढचा चेंडू सिराजने लेंग्थ थोडी कमी करून टाकला आणि त्याने झेल काढून दिला. ध्रुव जुरेलचेही कौतुक करायला हवे. त्याने यष्टिरक्षक म्हणून एक अभेद्य भिंत उभी केली होती. बॅटची खालची कड लागून गेलेले कालचे सर्व चेंडू त्याने सीमारेषेपर्यंत जाऊन दिले नाहीत. या जेमी स्मिथच्या बळीच्या वेळी बॅटची कड स्पष्ट लागली असतानाही पंच धर्मसेना यांना पंचांचा रिव्ह्यू घ्यावासा वाटला. कदाचित या अटीतटीच्या क्षणी पंचही दडपणाखाली असावेत. याच धर्मसेनाने सिराजच्या पुढच्या षटकात ओव्हरटनला पायचीत द्यायला काही सेकंदांचा विचार केला. ही जीवघेणी सेकंद होती आणि रिव्ह्यूमध्ये या बाद दिलेल्या निर्णयाचा फायदा भारताला झाला. पंच धर्मसेनाने या सामन्यात काही चुका केल्या, पण हे दोन निर्णय भारताच्या बाजूने दिले हे भारताचे भाग्य.
मोहम्मद सिराज एकीकडून भेदक मारा करत असताना प्रसिद्ध कृष्णा दुसर्या बाजूने त्याला उत्तम साथ देत होता. अॅटकिन्सनने घेतलेली एकेरी धाव इंग्लंडला महागात पडली. कारण त्यामुळे स्ट्राईकवर आलेल्या टंगचा कृष्णाचा यॉर्कर त्रिफळा उडवून गेला. कालच्या सकाळपासून सामन्याच्या तिन्ही निकालांच्या शक्यता कायम दिसत होत्या. इंग्लंडला गरज असताना वोक्स आपला निखळलेला खांदा घेऊन एका हाताने फलंदाजी करायला मैदानात उतरणार हे नक्की होते. अॅटकिन्सनला हाणामारी करून उरलेल्या धावा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. पुन्हा एक झेल सुटून षटकार गेल्यावर नशीब इंग्लंडच्या बाजूने आहे, वाटायला लागले. या क्षणी एकतर अॅटकिन्सन हीरो ठरणार होता किंवा सिराज. जय आणि पराजय यांच्यात फक्त एका मोठ्या फटक्याचे अंतर होते, पण याच लंडनमध्ये सिराजच्या डोळ्यातून लॉर्डस्ला अश्रू बघितल्यावर नियतीला लॉर्डस्च्या दुसर्या टोकाला असलेल्या ओव्हलवर सिराजला न्याय द्यायचा होता. त्याच्या यॉर्करने अॅटकिन्सनचा ऑफ स्टम्प उखडला आणि सिराज पुन्हा भावनाविवश झाला, पण यावेळी स्वप्नपूर्तीच्या समाधानाने.
जसप्रीत बुमराह संघात असतो तेव्हा सर्व फोकस बुमराहवर असतो. त्याला कापसाच्या गुंडाळीत ठेवून आपण जपतो, पण दुसर्या बाजूने राबणार्या सिराजचे कष्ट कुणी लक्षात घेत नाही. या मालिकेत तब्बल 185.3 षटके त्याने मारा करूनही शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा जोश, आवेग आणि जिंकण्याची जिद्द तसूभरही कमी झाली नव्हती. लॉर्डस्ला त्याला फलंदाजी करताना चेंडू दिसला कसा नाही म्हणून किंवा हॅरी ब्रूकचा झेल सोडल्यावर त्याच्या वेंधळेपणावर टीका करून त्याला व्हिलन बनवण्यात आले. कधीकधी घरात दोन भाऊ असताना जो प्रचंड हुशार असतो त्याच्यावर सर्व फोकस असतो, पण जो दुसरा मेहनती असतो त्याच्या मेहनतीचे म्हणावे तितके कौतुक होत नाही. मेहनत जेव्हा जास्त असते तेव्हा चुकाही जास्त असतात आणि दुर्दैवाने चुकांचीच चर्चा जास्त होते. या मालिकेत बुमराह तीनच सामने खेळणार होता आणि तो त्याप्रमाणे खेळला. बुमराह आपला हुकमी एक्का आहे यात वाद नाही, पण बुमराह न खेळलेल्या दोन सामन्यांत आपण विजय मिळवला. याचा अर्थ सिराजला जेव्हा घर सांभाळायची जबाबदारी दिली जाते तेव्हा तो या जबाबदारीचे भान जास्त चांगले ओळखतो. एजबॅस्टन आणि ओव्हलच्या विजयात इंग्लंडच्या 40 बळींपैकी 17 बळी सिराजने एकट्याने मिळवले आहेत.
या कसोटीच्या आधी संघनिवडीवर बरीच टीका झाली होती, पण प्रत्येकाची निवड त्या खेळाडूने सार्थ ठरवून टीकाकारांची तोंडे बंद केली. कोहली, शर्मा अशा दिग्गजांशिवाय भारताचा हा नवोदित संघ जेव्हा इंग्लंड दौर्यावर निघाला होता तेव्हा अनेकांनी मालिकेचे भाकीत इंग्लंड व्हाईट वॉश देईल असेच केले होते, पण नव्या कर्णधाराने नव्या संघाबरोबर उत्तम कामगिरी केली. या नव्या संघासाठी मालिका बरोबरीत सोडवणे म्हणजे जिंकल्याच्या बरोबरच आहे. लंडनला क्रिकेट पंढरीत आपल्याला गोड बातमी मिळाली नाही, पण पंढरीच्या गावातच आपण याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी अप्रतिम खेळ करत या मालिकेचा गोड शेवट केला.