

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण ३२ टी-२० सामने खेळले आहेत.
दोन्ही संघांमध्ये अखेरच्या टी-२० सामना टी२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळला गेला.
भारताने ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या १२ टी-२० सामन्यांपैकी ७ जिंकले आहेत.
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली असून, आता दोन्ही संघांमध्ये पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी मनुका ओव्हल मैदानावर खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सूर्यकुमार यादव याच्या हाती सोपवण्यात आली आहे.
दोन्ही संघांमध्ये टी-२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे, जे आपल्या विस्फोटक फलंदाजीने किंवा अचूक गोलंदाजीने काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता ठेवतात. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी, दोन्ही संघांमधील टी२० सामन्यांची आकडेवारीवर एक नजर टाकूया.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलियाने ११ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळला गेला होता. त्या सामन्यात भारतीय संघाने २४ धावांनी शानदार विजय नोंदवला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावांचा डोंगर उभा केला होता, प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १८१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या विजयात रोहित शर्माची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याने केवळ ४१ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९२ धावांची तडाखेबाज खेळी केली केली होती. त्याच्या या आक्रमक खेळाच्या जोरावर टीम इंडियाला विजय निश्चित करता आला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २००७ साली खेळला गेला होता. यात भारताने १५ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारतासाठी डावखुरा फलंदाज युवराज सिंगने केवळ ३० चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७० धावांची धडाकेबाज खेळी केली होती, तर महेंद्र सिंह धोनीनेही ३६ धावांचे योगदान दिले होते. युवराजच्या त्या चमकदार कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सर्वाधिक विजय : भारत
३२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २० विजय मिळवून भारताने वर्चस्व राखले आहे.
सर्वोच्च सांघिक धावसंख्या : भारत
२६ नोव्हेंबर २०२३ रोजी तिरुवनंतपुरम येथे भारताने २० षटकांत ४ बाद २३५ धावांचा डोंगर उभा केला होता.
सर्वात कमी सांघिक धावसंख्या : भारत
१ फेब्रुवारी २००८ रोजी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला १७.३ षटकांत सर्वबाद ७४ धावांवर गारद केले होते.
धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय : भारत
३० मार्च २०१४ रोजी मीरपूर येथे भारताने ऑस्ट्रेलियाला ७३ धावांनी पराभूत केले होते.
विकेट्सच्या फरकाने सर्वात मोठा विजय : ऑस्ट्रेलिया
२८ सप्टेंबर २०१२ रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताला ९ गडी राखून पराभूत केले होते (१४१ धावांचे लक्ष्य).
धावांच्या फरकाने सर्वात लहान विजय : ऑस्ट्रेलिया
२१ नोव्हेंबर २०१८ रोजी ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाने भारतावर केवळ ४ धावांनी विजय मिळवला होता.
विकेट्सच्या फरकाने सर्वात लहान विजय : भारत
२३ नोव्हेंबर २०२३ रोजी विशाखापट्टणम येथे भारताने ऑस्ट्रेलियाला २ विकेट्सनी हरवून रोमांचक विजय मिळवला होता.
सर्वाधिक धावा (फलंदाज) : विराट कोहली (२३ सामन्यांत ७९४ धावा)
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या : शेन वॉटसन (३१ जानेवारी २०१६ रोजी सिडनीमध्ये ७१ चेंडूंमध्ये नाबाद १२१ धावा).