

Kuldeep Yadav Engagement
टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कुलदीपची प्रेमाच्या मैदानात विकेट पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी लखनौ येथे आयोजित एका खासगी सोहळ्यात कुलदीपचा त्याची बालपणीची मैत्रिण वंशिका हिच्यासोबत साखरपुडा पार पडला. या सोहळ्यावेळी दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि रिंकू सिंह याच्यासह काही क्रिकेटपटू हजर राहिले.
त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात हे जोडपे एकमेकांना अंगठी घालत दिसतात. कुलदीपने साखरपुड्यात क्रीम रंगाची, एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी घातली होती. तर वंशिकाने चमकदार नारंगी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
रिंकू सिंहची होणारी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज यांनी कुलदीप- वंशिका सोबतचा एक फोटो X वर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे, ''जन्मोजन्मी बंधनात अडकणाऱ्या कुलदीप भैया आणि वंशिकाचे मनापासून अभिनंदन!.''
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका (Vanshika) कानपूरमधील श्यामनगरची राहणारी आहे. ती एलआयसीमध्ये काम करते. कुलदीप आणि वंशिकाची लहानपणापासूनची मैत्री आहे.
कुलदीप यादवची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे. २० जूनपासून टीम इंडिया इग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यामुळे कुलदीपचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. सुरुवातीला त्याच्या लग्नाची तारीख २९ जून ठरवण्यात आली होती. यावर्षीच्या अखेरीस दोघांचे लग्न होणार असल्याचे वृत्त आहे.
कुलदीप यादवने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकी गोलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली. त्याने १४ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे.