

Shafali Verma ICC Women's Player of the Month for November 2025
दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच विश्वचषक २०२५ चा किताब जिंकून इतिहास रचला. दरम्यान, संघाच्या या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी युवा सलामीवीर शफाली वर्मा हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नोव्हेंबर महिन्यासाठी शफाली वर्माची 'प्लेअर ऑफ द मंथ' (Player of the Month) म्हणून निवड केली आहे. तिच्या या धमाकेदार कामगिरीची आणि महत्त्वपूर्ण योगदानाची ही खास दखल आहे.
महिला वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात शफाली वर्माने जो पराक्रम दाखवला, तो प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या स्मरणात राहीला आहे. सुरुवातीला वर्ल्ड कप संघात स्थान न मिळालेल्या शफालीला, सलामीवीर प्रतिका रावल जखमी झाल्यानंतर अचानक संघात स्थान देण्यात आले. या संधीचे तिनेही सोने केले.
द. आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम लढतीत, शफालीने ७८ चेंडूंत ८७ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यात ७ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, महिला विश्वचषक फायनलमध्ये कोणत्याही भारतीय सलामीवीराने केलेला हा सर्वात मोठा वैयक्तिक स्कोर ठरला.
फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेल्यानंतर, शफालीने गोलंदाजीतही आपली जादू दाखवली. तिने आपल्या ७ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ३६ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. यात सुने लूस आणि मरिझान कॅप यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना बाद करून तिने द. आफ्रिकेच्या संघाला मोठे धक्के दिले. या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शफाली वर्माने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, ‘टीम इंडियाच्या या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयात योगदान देऊ शकले याचा मला खूप आनंद आहे. प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मी माझ्या संघातील सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंब आणि माझ्या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. आम्ही एक संघ म्हणून एकत्र जिंकतो किंवा हारतो, हा पुरस्कारही याच भावनेतून मिळाला आहे.’
महिला वर्ल्ड कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा शफाली वर्माला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र, तिने हिंमत न हारता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला चमकदार खेळ सुरूच ठेवला. प्रतिका रावलच्या दुखापतीमुळे तिला अचानक मिळालेल्या संधीचे तिने सोने केले आणि ती 'टीम इंडिया'ची लकी चार्म ठरली.