

पुणे : भारतीय क्रिकेटचा युवा तडफदार सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने अवघ्या ८ दिवसांच्या आत दुसरे शतक झळकावून आपली बॅट तळपत ठेवली आहे. रविवारी (१४ डिसेंबर) त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ मधील सुपर लीगमध्ये हरियाणाविरुद्ध धडाकेबाज शतक ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला. या मॅच विनिंग खेळीमुळे तो पुन्हा एकदा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.
यशस्वी जैस्वाल त्याच्या विस्फोटक कामगिरीमुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, त्याने गेल्या ८ दिवसांत जी दोन शतकं झळकावली, त्या दोन्ही वेळेस त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पहिले शतक : हरियाणाविरुद्धच्या या शतकापूर्वी, त्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतासाठी १२१ चेंडूंमध्ये नाबाद ११६ धावांची शानदार खेळी केली होती.
दुसरे शतक : त्यानंतर पुणे येथील डी. वाय. पाटील ॲकॅडमीमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात त्याने हरियाणाविरुद्ध हा कारनामा केला. हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ५वे शतक ठरले.
हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईसमोर २३५ धावांचे मोठे आव्हान होते. हे आव्हान यशस्वी जैस्वालने अक्षरशः आपल्या आक्रमक बॅटिंगने सहज पार केले. त्याने केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढील अर्धशतक त्याने आणखी वेगाने पूर्ण करत अवघ्या ४८ चेंडूत शतक पूर्ण केले. यशस्वीने ५० चेंडूंत १६ चौकार आणि १ षटकार लगावत १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट २०२ राहिला. त्याच्या आणि सर्फराज खानच्या (२५ चेंडूत ६४ धावा) वादळी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने ६ गडी राखून आणि १५ चेंडू शिल्लक असताना २३५ धावांचे विशाल लक्ष्य गाठले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला.
यशस्वी जैस्वालचा टी२० फॉर्म सातत्याने उत्कृष्ट राहिला आहे. आयपीएलमध्ये आणि आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६४.३१ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ७२३ धावा केल्या आहेत. तरीही, तो गेल्या दीड वर्षांपासून भारतीय टी-२० क्रिकेट संघाबाहेर आहे.