

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धाही पार पडणार असल्याने भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडू या मालिकेसाठी अनुपलब्ध राहतील. त्यामुळे पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत रंगणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची प्रत्यक्ष तयारी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यापासून सुरू करणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाचे संपूर्ण लक्ष आता मधल्या फळीत सक्षम पर्याय (बॅकअप) तयार करण्यावर केंद्रित झाले असून, या रणनीतीचा भाग म्हणून युवा फलंदाज तिलक वर्माकडे श्रेयस अय्यरचा भक्कम पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, डावखुरा फलंदाज असल्यामुळे तिलक वर्माच्या समावेशाने भारताच्या फलंदाजी फळीत वैविध्य निर्माण होईल; कारण सध्याच्या संघात प्रामुख्याने उजव्या हाताच्या फलंदाजांचे प्राबल्य आहे. याशिवाय तिलकला त्याच्या गोलंदाजीवरही विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याच्या 'ऑफ-ब्रेक' गोलंदाजीत उत्तम क्षमता असल्याचे मानले जात आहे. वस्तुतः अव्वल फळीतील फलंदाजांमध्ये गोलंदाजीच्या पर्यायांची वानवा असल्याने खालच्या फळीवर आणि मुख्य गोलंदाजांवर सातत्याने अतिरिक्त ताण येत असल्याचे संघ व्यवस्थापनाने अधोरेखित केले आहे.
मधल्या फळीसाठी सक्षम पर्यायांची वानवा
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या मते सद्यस्थितीत मधल्या फळीसाठी पुरेसे राखीव पर्याय उपलब्ध नाहीत. हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या वारंवार दुखापतग्रस्त होण्याच्या शक्यता लक्षात घेता, अव्वल फळीत असा खेळाडू असावा जो एकदिवसीय सामन्यात किमान चार षटके सहज टाकू शकेल. गेल्या वर्षभरात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संतुलन राखण्यासाठी संघ व्यवस्थापनाला वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यांना पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकावर खेळवण्याची तडजोड करावी लागली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेतही उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या आधी इशान किशनला फलंदाजीसाठी मैदानात पाठवण्यात आले होते.
युवा राखीव फळी उभी करणे काळाची गरज
विश्वचषकादरम्यान दक्षिण आफ्रिकेतील वेगवान व उसळत्या खेळपट्ट्यांच्या आव्हानासाठी संघाला आतापासूनच सज्ज राहावे लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता, शिवाय वेग आणि उसळीविरुद्ध त्याची अद्याप म्हणावी तशी कठोर परीक्षा झालेली नाही. दुसरीकडे संघात आधीपासूनच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या रूपाने दोन ज्येष्ठ खेळाडू असून, त्यांनाही वारंवार शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विश्वचषकापर्यंत लोकेश राहुल ३५ वर्षांहून अधिक वयाचा होईल, तर रवींद्र जडेजाच्या निवडीबाबतही शाश्वती नाही. या वाढत्या वयामुळे व तंदुरुस्तीच्या अडचणींमुळे संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळेच भविष्याचा वेध घेत युवा खेळाडूंचा राखीव संच तयार करणे संघ व्यवस्थापनाला अत्यावश्यक वाटते.
निवड समिती खेळाडूंना त्यांच्या मूळ फलंदाजीच्या स्थानावरच संधी देण्याच्या मतावर ठाम आहे. गेल्या वर्षी ऋतुराज गायकवाडला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आले होते. त्याने रायपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते; परंतु त्यानंतर त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. शुभमन गिलच्या दुखापतीनंतर गायकवाडची निवड केवळ पर्यायी सलामीवीर म्हणूनच करण्यात आली होती. संघ व्यवस्थापनाच्या मते त्या जागेवर तिलकला संधी दिली जाऊ शकली असती. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देवदत्त पडिक्कलने सलामीवीर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असल्याने, त्याला मधल्या फळीसाठी एकदिवसीय संघात आणण्याची कोणतीही घाईगडबड व्यवस्थापनाला करायची नाही.