

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि १९९२ चे विश्वचषक विजेते इम्रान खान यांच्या तुरुंगवासावर बोलताना दिग्गज फलंदाज जावेद मियाँदाद यांना अश्रू अनावर झाले. इम्रान खान अतिशय प्रामाणिक व्यक्ती असून त्यांना तत्काळ तुरुंगातून मुक्त करण्यात यावे, असे भावुक आवाहन मियाँदाद यांनी केले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सद्यस्थितीवर तीव्र दु:ख व्यक्त केले.
जावेद मियाँदाद आणि इम्रान खान यांनी अनेक वर्षे एकत्र पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. १९९२ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयामध्ये या उभयतांचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले होते. ‘इम्रान यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. ते एक निष्कलंक आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहेत. अशा व्यक्तीला अजूनही तुरुंगात का ठेवण्यात आले आहे, हे समजणे कठीण आहे,’ अशा शब्दांत मियाँदाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
७३ वर्षीय इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असून विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर २०२३ पासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात कैद आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मियाँदाद यांनी केलेल्या या आवाहनामुळे इम्रान खान यांच्या सुटकेचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.